वैजापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना मोबाईल व अन्य सुविधा उपलब्ध करून द्या – अन्यथा तीव्र आंदोलन

शिक्षकभारती अंगणवाडी संघटनेचा निवेदनाद्वारे इशारा

वैजापूर ,२९ जून/ प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यात एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागात कार्यरत अंगणवाडी सेविकांना बालक व त्यांच्या कुंटुबाची ऑनलाईन संकेतस्थळावर महिती संकलित करण्यासाठी ग्रामपंचायत कडून दर्जेदार कंपनीचा मोबाईल संच तसेच आहार तयार करण्यासाठी गॅस सुविधा व नळजोडणी उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी संघटनेच्या पदाधिकारी आक्रमक झाल्या आहेत. या सुविधाचा लाभ लवकर न मिळाल्यास संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य पुर्व प्राथमिक अंगणवाडी संघटनेकडून गटविकास अधिका-यांना देण्यात आला. 

संघटनेच्या जिल्हाध्यक्ष माया म्हस्के, तालुकाध्यक्ष पुष्पा जाधव, तालुका संघटक अश्विनी बरकसे आदी पदाधिका-यांच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी एच.आर.बोयनर यांना एका निवेदनाद्वारे हा इशारा  दिला. ग्रामीण भागातील ३ ते ६ वयोगटातील बालकांसाठी अंगणवाडी स्तरावर दररोज सकस आहार तयार करण्यासाठी कोणतीही सुविधा नव्हती.अंगणवाडी सेविकांना आहार तयार करण्यासाठी शासनाने ग्रामपंचायत मार्फत मोबाईल संच तसेच व गॅस सुविधा देण्याची भूमिका घेतली आहे.मात्र त्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याने अंगणवाडी सेविकांना मोबाईल संच व गॅस सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

साहित्य अंगणवाडी स्तरावर वाटप करा

अंगणवाडी स्तरावर अंगणवाडी सेविकांना विविध साहीत्य दिले जाते. बेबी किट, खेळणी, पुर्व प्राथमिक शालेय शिक्षण साहित्य किट इ. हे अंगणवाडी स्तरावर वाटप करण्यात यावे. अंगणवाडी सेविका यांना नेण्यास अडचणी येणार नाही. अंगणवाडी सेविका यांची मासिक बैठका महिन्यातून दोनदा घेण्यात याव्यात. वैजापूर प्रकल्पांत एकुण १० बिट असून प्रत्येक बिटला एक पर्यवेक्षिका असणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत ५ पर्यवेक्षीका उपलब्ध आहे. उर्वरीत ५ पर्यवेक्षिका पदे रिक्त आहेत.