वैजापूर शहर व परिसरात ईद उल अजहा (बकरी ईद) उत्साहात साजरी

वैजापूर ,२९ जून/ प्रतिनिधी :-त्याग व समर्पणाचं प्रतीक असलेली बकरी ईद (ईद उल अजहा) शहर व परिसरात गुरुवारी (ता.29) उत्साहात साजरी करण्यात आली. येथील ईदगाह मैदानावर शहर व परिसरातील मुस्लिम बांधवांनी  “बकरी ईद”ची नमाज अदा केली. मशीदीचे इमाम यांनी या भूतलावर भरपूर पाऊस पडू दे, रोगराई कायमची नष्ट होऊ दे, आमच्याकडून ज्या चुका झाल्या त्याबद्धल आम्हाला माफ कर अशी प्रार्थना केली. बंधुभाव, सुख, समृद्धी व आरोग्य वैभव लाभू दे अशी प्रार्थना करीत “बकरी ईद” उत्साहात साजरी झाली. 

नगरपालिकेच्यावतीने  प्रशासक तथा मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी ईदगाह मैदानावर मंडप उभारला होता. या मंडपात मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी महक स्वामी, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे व सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत उपस्थित होते. त्यांनी मुस्लिम बांधवाना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. शहर काझी हाफिजोद्दीन, मलिक काझी, हाजी शेख अकिल, सय्यद हिकमत, ॲड.रियासत अली, काझी लईक इनामदार, सय्यद अली, अहमद पठाण यांच्यासह 

मुस्लिम बांधवाना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पोलीस नाईक संजय घुगे, तलाठी आर.जे. पेहरकर, पालिकेचे स्वछता निरीक्षक प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन, रायते, पैठणकर आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.