वैजापूर बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याला १ हजार ६०० रुपये भाव ; आवक वाढली

वैजापूर बाजार समितीच्या कांदा खरेदी केंद्रात शुक्रवारी (ता.30) कांद्याला १ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला.भाव वधारल्याने मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढली असून खरेदी केंद्रात कांदा खरेदी दरात सुधारणा होत असल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले. चांगल्या प्रतवारीचा कांद्याला १२०० ते १६०० पर्यतचा बाजारभाव मिळाला. 

तालुक्यात मागील हंगामात ऐन कांदा काढणी दरम्यान पावसाचे आगमन झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पावसाच्या तडाख्यामुळे कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बाजारपेठेत चांगल्या प्रतवारीचा कांदा नसल्यामुळे फेब्रुवारी – मार्च या महिन्यात कांद्याचे बाजारभाव कोसळले होते. दरम्यान मे – जून या महिन्यापासून कांदा खरेदीचे बाजारभावात सुधारणा होताना दिसून येत आहे. ५०० ते १ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची उसळी आता १ हजार ६०० पर्यत पोहचली आहे. बाजार समितीच्या घायगांव येथील  कांदा मार्केट मधे शुक्रवारी सकाळी पार पडलेल्या मोकळा कांदा लिलावात साडे चार हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. प्रतवारीनुसार ४०० ते १ हजार ६२० रुपये प्रति क्विंटल भावाने व्यापाऱ्यांनी हा कांदा खरेदी केला. कांदा खरेदी केंद्रात उशिरा का होईना कांदा खरेदी दरात सुधारणा होत असल्याने शेतक-यांत समाधान व्यक्त केले जात आहे. 

५४ लाखाची उलाढाल

बाजार समितीच्या कांदा खरेदी केंद्रात शुक्रवारी सकाळी पार पडलेल्या लिलावात ४ हजार ५०० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. कांदा खरेदी – विक्री व्यवहारात आज दिवसभरात ५४ लाखाची उलाढाल झाल्याचे केंद्रप्रमुख चंचल मते यांनी सांगितले.

आठवडाभर होते कांदा खरेदी

बाजार समितीचे घायगाव येथील कांदा खरेदी केंद्रात कांदा उत्पादक शेतक-यांसाठी आठवड्यातील सात दिवस मोकळा व गोणी लिलावाद्वारे दररोज सकाळी व सांयकाळी अशा दोन टप्प्यात कांदा खरेदी केला जातो.शेतक-यांना कांदा विक्री नंतर रोख पेमेंट देण्याच्या सूचना व्यापा-यांना दिली असल्याची महिती बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव यांनी दिली.