वांजरगाव येथील कोल्हापुरी बंधारा दुरुस्ती कामासाठी १३ कोटींचा निधी मंजूर

आ.बोरणारे यांच्या प्रयत्नांना यश

वैजापूर ,​३०​ जून/ प्रतिनिधी :-गोदावरी नदीपात्रातील वांजरगाव कोल्हापुरी बंधारा  दुरुस्ती कामाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १३ कोटी ७ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. आमदार रमेश बोरनारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे हा निधी मंजूर होऊन बंधारा दुरुस्ती कामाचा मार्ग मोकळा झाला. 

२०१९ या वर्षात नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे गोदावरी नदी पात्रात तीन लाख क्युसेक वेगाने पाणी सोडल्यामुळे वांजरगाव येथील गोदावरी नदीपात्रातील कोल्हापुरी बंधा-यांचा दोन्ही बाजूकडील भरीव पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला होता. नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत या बंधा-यांची डागडुजी दुरुस्तीसाठी आमदार रमेश बोरनारे यांनी जलसंधारण विभागाकडे बंधारा हस्तांतरीत करून घेतला होता. मात्र जलसंधारण विभागाने बंधारा उभारणीसाठी झालेल्या मूळ खर्चाच्या २० टक्के रक्कम बंधारा दुरुस्तीसाठी खर्च करण्याच्या तरतुदीमुळे बंधारा दुरुस्ती कामाचे घोडे अडून पडले होते. सराला बेटाचे मंहत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आ.बोरनारे यांनी पूराचा जोर ओसरल्यानंतर पुन्हा पाणी वाहून जाऊ नये यासाठी वांजरगाव, भालगाव, कापुसवाडगाव शिंदे वस्ती व श्रीरामपूर तालुक्यातील सराला, गोवर्धन, रामपूर, नाऊर आदी गावांतील नागरिकांच्या लोकसहभागातून बंधा-यांची तात्पुरती डागडुजी करून घेतली होती. 

आमदारांच्या चार वर्षांच्या पाठपुराव्याला यश

गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या तडाख्यात उध्वस्त झालेल्या वांजरगाव येथील कोल्हापुरी बंधारा दुरुस्ती कामासाठी जलसंधारण विभागाकडून अपेक्षित निधी उपलब्ध होण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे आ. रमेश बोरनारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बंधारा दुरुस्ती कामासाठी विशेष बाब म्हणून २० कोटीचा निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर मंत्रिमंडळ बैठकीत १३ कोटी ७ लाखाचा निधी पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आला आहे.