चांडगाव येथे गायरान जमिनीवरील अतिक्रमणाच्या वादातून हाणामारी ग्रामपंचायत सदस्यासह चार जण जखमी

वैजापूर ,​३०​ जून/ प्रतिनिधी :-गायरान जमिनीवरील अतिक्रमणाच्या वादातून दोन गटात वाद होऊन झालेल्या हाणामारीत ग्रामपंचायत सदस्यासह चार जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी वैजापूर तालुक्यातील चांडगाव येथे घडली. या घटनेत ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब जाधव यांच्यासह चार जण जखमी झाले असून

उपचारासाठी त्यांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

तालुक्यातील नांदगाव येथील गायरान जमिनीवर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यापैकी ताराबाई सोनवणे यांनी त्यांच्या ताब्यातील जमीन उपकेंद्रासाठी दिल्याने गावकऱ्यांच्या संमतीने बाजूला असलेली एक एकर जमीन त्यांना देण्यात आली आहे. मात्र, आरोपी जनार्दन दळे व त्यांच्या दोन भावांनी अतिक्रमण करून सोनवणे या महिलेस जमीन कसण्यास अडथळा निर्माण करीत आहेत. म्हणून आज सकाळी आठच्या सुमारास ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब जाधव, पोलीस पाटील भाऊसाहेब रहाणे, सचिन राहणे व गावातील ईतर लोक त्यांना समजावण्यासाठी गेले असता जनार्दन दळे व ताराबाई सोनवणे यांच्यात वाद सुरू झाला. दोघांनाही समजून सांगत असतांना जनार्दन दळे व त्यांचे भाऊ व घरातील अन्य सदस्यांनी धारदार शस्राने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेत ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब जाधव,  सचिन रहाणे, नवनाथ गायकवाड व प्रमोद गायकवाड हे चार जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी बाबासाहेब जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.