समृध्दी महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्यानजीक भीषण अपघात;  १२ जण जागीच ठार

मृत व जखमी हे सर्व नाशिक येथील रहिवासी

वैजापूर,१५ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-सैलानीबाबा दरगाहाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्यानजीक घडली. भरधाव जाणाऱ्या टेंपो ट्रॅव्हल्सने उभ्या ट्रकला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १२ जण जागीच ठार २३ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये पाच पुरुषांसह मुलगी व सहा महिलांचा समावेश आहे.मृत व जखमी हे सर्व नाशिक येथील रहिवासी आहेत.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक येथील भाविक बुलढाणा जिल्ह्यातील सैलानीबाबा दरगाहाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर ते सर्व भाविक टेंपो ट्रॅव्हल्सने पुन्हा नाशिककडे येण्यासाठी निघाले असता नागपूर-मुंबई महामार्गावरील वैजापूर जांबरगाव शिवारातील टोलनाक्यापासून साधारणतः तीन किलोमीटर अंतरावर (छत्रपती संभाजीनगर दिशेने ) ट्रक उभा होता. या उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सने जोराची धडक दिल्याने चालकासह 12 जण जागीच ठार झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, टेंपो ट्रॅव्हल्सने दिलेल्या धडकेनंतर महामार्गालगतच्या रहिवाशांना आवाज ऐकू गेल्यानंतर ते तात्काळ मदतीसाठी धावून गेले. ट्रॅव्हल्सच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला आहे.

घटनेनंतर मदतकार्यासाठी धावून गेलेल्या नागरिकांनी वैजापूर पोलिसांसह उपजिल्हा रुग्णालयात कळविले. त्यानंतर पाच ते सहा रुग्णवाहिकेव्दारे त्यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात. यातील 12 जणांना डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर अन्य 20 जखमींवर उपचार करून यातील 12 जणांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या 9 जणांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये एका 4 वर्षीय मुलीसह पुरुष व महिलांचा समावेश आहे. हे नाशिक येथील पाथर्डी व इंदिरानगर परिसरातील रहिवासी आहेत.

दरम्यान अपघातानंतर आमदार रमेश बोरनारे यांच्यासह मर्चंटस् बँकेचे माजी चेअरमन विशाल संचेती, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, संजय बोरनारे, रणजीत चव्हाण, नीलेश पारख, सेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, वाहेद शेख, अक्षय साठे आदींनी उपजिल्हा रुग्णालयात मदतकार्य केले. मृतांची नावे निष्पन्न होत नसल्याने सर्वजण भ्रमणध्वनीवदारे नाशिक येथील परिचितांनाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होते.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याचे घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या घटनेबद्दल मोदी यांनी ट्विटमधून तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

अपघातातील मृतांची नावे अशी –

1) तनुश्री लखन सोळसे (वय 5 वर्षे, रा.समतानगर, नाशिक)

2) संगीता विलास अस्वले (वय 40 वर्षे, रा. वनसगाव, तालुका निफाड जिल्हा नाशिक)

3) पंजाबी रमेश जगताप (वय 38 वर्षे, रा. राजूनगर, नाशिक)

4) रतन जमदाडे (वय 45 वर्ष, रा. संत कबीरनगर, वैजापूर)

5) काजल लखन सोळसे (वय 32 वर्ष, रा. समतानगर, नाशिक)

6) रजनी गौतम तपासे (वय 32 वर्षे, रा. गवळणी, नाशिक)

7) हौसाबाई आनंदा शिरसाट (वय 70 वर्ष, रा, उगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक)

8) झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय 58 वर्ष, रा. राजूनगर, नाशिक)

9) अमोल झुंबर गांगुर्डे (वय 18 वर्षे, रा. राजूनगर, नाशिक)

10) सारिका झुंबर गांगुर्डे (वय 40 वर्ष, रा. राजूनगर, नाशिक)

(11) मिलिंद हिरामण पगारे (वय 50 वर्ष, रा. कोकणगाव ओझर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक)

12) दीपक प्रभाकर केकाने (वय 47 वर्ष, रा. बसवंत पिंपळगाव नाशिक)

जखमींचे नावे

1) पुजा संदीप अस्वले (वय 35 वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक)

2) वैष्णवी संदीप अस्वले (वय 12 वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक)

3) ज्योती दीपक केकाणे (वय 35 वर्ष, रा. पिंपळगाव, ता. निफाड, जि. नाशिक)

(4) कमलेश दगु म्हस्के, (वय 32 वर्ष, रा. राहुलनगर, नाशिक)

5) संदीप रघुनाथ अस्वले (वय 38 वर्ष, रा. तिरुपतीनगर, जेलरोड, नाशिक)

6) युवराज विलास साबळे, वय 18 वर्ष, रा. इंदिरानगर, नाशिक

7) कमलबाई उब म्हस्के (वय 77 वर्ष, रा. ममदापूर, नाशिक)

8) संगीता दगडु म्हस्के (वय 60 वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक)

(9) दगु सुखदेव म्हस्के (वय 50 वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक)

10) लखन शंकर सोळसे (वय 28 वर्ष, रा. समतानगर, नाशिक)

11) गिरजेश्वरी संदीप अस्वले (वय 10 वर्ष, रा. नाशिक)

12) शांताबाई नामदेव म्हस्के (वय 40 वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक)

13) अनील लहानु साबळे (वय 32 वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक)

14) तन्मय लक्ष्मण कांबळे (वय 08 वर्ष, रा. पिंपळगाव, ता. निफाड, जि. नाशिक)

15) सोनाली आप्पासाहेब त्रिभुवन (वय 25 वर्ष, रा. वैजापुर)

16) श्रीहरी दिपक केकाणे (वय 12 वर्ष, रा. पिंपळगाव, ता. निफाड, जि. नाशिक)

17) सम्राट दिपक केकाणे (वय 06 वर्ष, रा. पिंपळगाव, ता. निफाड, जि. नाशिक)

उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे उपचार घेत आलेले जखमी

(18) गौतम भास्कर तपासे (वय 38 वर्षे, राहणार गवळणी तालुका जिल्हा नाशिक)

19) कार्तिक लखन सोळशे (वय 5 वर्ष, राहणार समता नगर तालुका जिल्हा नाशिक)

20) धनश्री लखन सोळसे (वय 8 वर्ष, राहणार समता नगर तालुका जिल्हा नाशिक)

(21) संदेश संदीप अस्वले (वय 12 वर्ष, राहणार तिरुपतीनगर तालुका जिल्हा नाशिक)

22) प्रकाश हरी गांगुर्डे (वय 24 वर्ष, रा. त्रिंबक ताजी नाशिक)

23) शंकर ( मुलगा)

दुःखद आणि दुर्दैवी-मंत्री अतुल सावे 

छत्रपती संभाजीनगर जवळ झालेल्या अपघातातील जखमींना घाटी रुग्णालयात भेटून प्रकृतीची विचारपूस केली. एकूण २३ जखमींपैकी १७ जणांवर उपचार सुरू आहेत. ६ जखमींवर वैजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.मध्यरात्रीच्या सुमारास एक खाजगी वाहन ट्रकवर आदळून झालेल्या या अपघातात १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. हा अपघात अतिशय दुःखद असून अपघातग्रस्तांच्या प्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.