सुसाईड नोट लिहून 40 वर्षीय तरुणाची आत्महत्या ; वैजापूर शहरातील घटना

वैजापूर,१३ जुलै /प्रतिनिधी :- राहत्या घरात 40 वर्षीय इसमाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी शहरातील पाटील गल्लीत घडली. मृताकडे एक सुसाईड नोट मिळून आली असून यात काहींकडून पैसे घेतले असल्याचे म्हटले आहे.  प्रविण जयराम उगले ( 40 वर्ष, रा.पाटील गल्ली, वैजापूर ) असे मृताचे नाव आहे.

प्रवीण यांची जुने बसस्थानक परिसरात पान टपरी आहे. मंगळवारी दुपारी त्यांनी पाटील गल्लीतील घरातील आपल्या खोलीत छताला गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार सायंकाळी चार वाजेला उघडकीस आला. कुटुंबीयांनी तत्काळ प्रवीण यांना खाली उतरवून येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ते मृत झाल्याचे सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवडे, सहायक फौजदार रज्जाक शेख, महेश बिरुटे, सूर्यकांता भुऱ्हे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. यावेळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून यात प्रवीणने लोकांकडून पैसे उसने घेतले आहे. ते मीच देईल तुम्ही त्याचे टेंशन घेवू नका ” असे कुटुंबियांना उद्देशून म्हटले आहे. या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृत प्रवीण उगले हे शहरातील साई माउली बहुउद्देशीय संस्थेचे सक्रीय संस्थापक सदस्य होते. त्यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.