समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-मुख्यमंत्र्यांनी अपघाताचे कारण सांगत दिले कारवाईचे आदेश

मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर काल मध्यरात्री एक भीषण अपघात झाला. देवदर्शन करून परतत असलेल्या भाविकांवर काळाचा घाला घातला गेला. हे भाविक सैलानी येथील दर्ग्यावरून परतत होते. त्या दरम्यान समृद्धी महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगाव टोलनाक्याजवळ ट्रॅव्हल्स बस आणि ट्रक यांच्यात मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला तर २३ जण जखमी झाले आहेत. या घटनेवर शोक व्यक्त करत राज्य सरकार व पंतप्रधान कार्यालयाने मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताचे कारण सांगत दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

आज ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाबाबत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आमच्या कॅबिनेटमधील मंत्री दादा भुसे, संदीपान भुमरे, तसेच अतुल सावे, रमेश बोरनारे यांनी आज घटनास्थळी भेट दिली, तसेच जखमींची विचारपूसही केली.

या घटनेबाबत मी पोलीस महानिरीक्षकांशी, तिथल्या पोलीस अधीक्षकांशी बोललो. मी त्यांना याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. तसेच जखमींवरील उपचारांचा खर्च आपलं सरकार करेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

अपघात नेमका कशामुळे झाला?

या अपघातातील जखमी प्रवाशांनी दावा केला आहे की आरटीओ अधिकाऱ्यांनी एक ट्रक थांबवला होता. हा ट्रक रस्त्याकडेला उभा होता. ट्रकचालक तिथून ट्रक काढत असताना टेम्पो ट्रॅव्हलरने मागून धडक दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील जखमी प्रवाशांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, अपघाताच्या प्राथमिक पाहणीनुसार, आरटीओने ट्रक थांबवला होता. त्या ट्रकला ही टेम्पो ट्रॅव्हलर गाडी धडकली. यामध्ये आरटीओचे अधिकारी किंवा ट्रकचा चालक जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.