माजी शिक्षणाधिकारी ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

वैजापूर,९ एप्रिल  /प्रतिनिधी :- “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव”चे औचित्यसाधत शिव – उमा सेवाभावी विकास संस्था, वैजापूर या संस्थेच्यावतीने येथील सामाजिक कार्यकर्ते व पालिकेचे माजी शिक्षणाधिकारी ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक मांजरे होते. मौलाना आझाद शाळेचे मुख्याध्यापक जी.जी.राजपूत, बी.बी.जाधव, नीता पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शिल्पाताई परदेशी यांनी ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन ठाकूर माझ्या हस्ते “जीवन गौरव” पुरस्कार देऊन गौरव होणे  हे मी माझं भाग्य समजते असे गौरवोदगार काढले.  धोंडीरामसिंह राजपूत यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राष्ट्रीय व  साहित्यिक कार्यापासून बरेच शिकायला मिळते त्यांचा आदर्श ठेवूनच मी कार्यरत आहे असेही शिल्पा परदेशी पुढे म्हणाल्या.

सत्काराला उत्तर देताना ठाकूर म्हणाले की, माझा गौरव हा संपूर्ण विद्यार्थी व तालुक्यातील शिक्षकांचा गौरव आहे. राष्ट्रीय व सामाजिक कार्याची मला आवड असून यापुढेही माझे कार्य निस्वार्थपणे सुरू राहील. 

प्रास्ताविक अशोक मांजरे यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांना बाहुली कशी बनवावी याचे प्रात्यक्षिक ही त्यांनी यावेळी करून दाखवले.याप्रसंगी शिक्षिका राजश्री बंड, संदीप शेळके, लता सुखासे, ज्योती दिवेकर, सुनीता वसावे, सुवर्णा बोर्डे, वैशाली पगार आदी उपस्थित होते.  या उपक्रमातून उत्कृष्ट  शिक्षकांनी बजावली,या प्रसंगी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते