एसटी कर्मचाऱ्यांची शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावर चप्पल फेक

टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्रात नाही-शरद पवार

मुंबई ,८ एप्रिल /प्रतिनिधी :-एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ या बंगल्यावर आंदोलन पुकारले. याठिकाणी शरद पवार हाय हाय च्या घोषणा देत कर्मचा-यांनी चप्पल आणि दगडफेक केली. एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून कोर्टाचा निर्णय मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण परिस्थितीला शरद पवार हेच जबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक हे सिल्व्हर ओकच्या दिशेने येतील आणि असा हल्ला करतील हे मुंबई पोलिसांना समजू शकले नाही, याचा अंदाज त्यांना आला नाही, यावरुन हे मुंबई पोलिसांच्या गोपनीय शाखेचं अपयश असल्याचं म्हटलं जात आहे.

मुंबई हायकोर्टाने विलिनीकरणास नकार देत एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र एसटीच्या विलीनीकरणावर अद्याप कर्मचारी ठाम आहेत. कोर्टाचा निर्णय अन्यायकारी असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी कोणत्याही बैठका घडवून आणलेल्या नाहीत. पवार हे विलीनीकरण न होण्यामागचे सूत्रधार असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या धोरणामुळे १२४ एसटी कर्मचाऱ्यांचा खून केल्याची संतप्त भूमिका आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली.

तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधीच्या मागण्यांबाबत राज्य शासनाला आदेश दिले. या आदेशाचे आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. दरम्यान, जोपर्यंत हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत मिळत नाही तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत कोणत्या तारखेला, किती वाजता एकाच वेळी निर्णय घेऊ, अशी भूमिका या उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना मांडली होती. मात्र, तरीही कामगार मोठ्या प्रमाणात एकत्र जमले व त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांना जबाबदार धरत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी ऑक्टोबर २०२१ पासून राज्यातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक वेळा कामगारांना कामावर हजर राहण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर हजर राहत नसल्याने राज्य सरकारने देखील ताठर भूमिका घेतली.

४१ टक्के पगारवाढ आणि अन्य मागण्या मान्य केल्यानंतर राज्य सरकारने अखेर ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू होण्याचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, अद्याप कर्मचारी संघटना संपावर ठाम असल्याने कोर्टाने कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

कर्मचाऱ्यांनी हे आदेश मान्य न केल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यास राज्य सरकारला कोर्टाने मोकळीक दिली आहे. तसेच सरकारचा निर्णय धोरणात्मक असल्याचे निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवले आहे.

गुणरत्न सदावर्ते यांना अटक

शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या घरावर एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला, याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे, याआधी सदावर्ते यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, त्यावेळी मला नोटीस न देता ताब्यात घेण्यात आले आहे, हा माझ्या हत्येचा कट आहे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं होतं. चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांच्यावर करण्यात आला आहे.

माझे आईवडील आणि माझी मुलगी यांना मी भेटते- सुप्रिया सुळे

Image

पण शांतता ठेवा आपण बसून बोलू अशी माझी नम्र विनंती आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.माझ्या घरात माझे आईवडील आहेत, आणि माझी मुलगी आहे, म्हणून शांतता ठेवा असं वागू नका अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी महिला आंदोलकांना केली.

प्रशासन ते राजकीय क्षेत्रातली मंडळी दाखल

शरद पवारांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील हे दाखल झाले, त्यांच्या पाठोपाठ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सिल्व्हर ओकवर पोहोचले, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांची देखील उपस्थिती होती, दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी याविषयावर फोनवर चर्चा केली.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी हे सरकारविरोधी आणि अज्ञातशक्ती असल्याचं म्हटलं आहे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील या हल्ल्याच्या पाठीमागे तसेच अशा कारवायांमागे अज्ञात शक्ती असल्याचं म्हटलं आहे.

१०७ आंदोलकांवर गुन्हा दाखल

सिल्व्हर ओकवर हल्ला करण्याच्या आरोपावरुन १०७ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.यानंतर मुंबई सीएसएमटीसमोरील आझाद मैदानात मागील ५ महिन्यापासून आंदोलनाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पोलिसांचा गराडा दिसू लागला, यावेळी पोलिसांनी आझाद मैदानात ध्वज संचलन केलं. आझाद मैदान लवकरात लवकर खाली केली जाण्याची चिन्हं यावेळी दिसून आली. यानंतर आझाद मैदान खाली करुन सील करण्यात आले आहे.

अजित पवार यांची प्रतिक्रिया

अजित पवार यांनी आपल्याच सरकारच्या गृहखात्याचे शरद पवार यांच्याघरावरील हल्लाप्रकरणी कान खेचले आहेत, हे गृहखात्याचं अपयश असल्याचं परखड मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्रात नाही-शरद पवार

आज माझ्या निवासस्थानाबाहेर जो प्रकार घडला त्यासंबंधी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवरही त्याचा दुष्परिणाम होतो, त्याचे उदाहरण आज आपण पाहिले. राजकारणात मतभेद असतात, संघर्ष असतात, पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्रात नाही.परंतु, गेले काही दिवस आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना जे सांगण्याचा प्रयत्न झाला तो शोभनीय नव्हता. एसटी कर्मचारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घनिष्ठ संबंध आहेत. गेल्या ४०-५० वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांचे एकही अधिवेशन माझ्याकडून कधी चुकलेले नाही. तसेच ज्या ज्या वेळी प्रश्न निर्माण झाले तेव्हा त्या प्रश्नांना हातभार लावून सोडवण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांनी कष्ट घेतले. यावेळी एक चुकीचा रस्ता त्यांना दाखवला गेला आणि त्याचे दुष्परिणाम आज याठिकाणी आहेत. कारण नसतानाही जवळपास काही महिने घरदार सोडून एसटी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला आणि त्यामुळे प्रचंड आर्थिक संकट त्याच्या कुटुंबावर आले. दुर्दैवाने काही व्यक्तींना यात आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे जे नेतृत्व अशी टोकाची भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण करते तेच नेतृत्व आत्महत्या आणि तत्सम गोष्टीला जबाबदार आहे. यातून जे नैराश्य आले ते कुठेतरी काढले पाहिजे यासाठी त्यांनी याठिकाणी मला टारगेट करण्याचा प्रयत्न केला. आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या नेहमीच पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. कर्मचाऱ्यांना चुकीचा रस्ता कोणी दाखवत असले तर त्या रस्त्याला विरोध करणे हे तुमची, माझी, सगळ्यांची जबाबदारी आहे. आंदोलनाची थोडी माहिती कळताच तातडीने अनेक सहकारी इथे पोहचले ते माझ्या पाहण्यात होते. त्यासाठी मला वेगळे सांगण्याची गरज नाही. संकट आले तर आपण सगळे एक आहोत, हेच तुम्ही दाखवून दिले,

घडलेला प्रकार अतिशय चिंताजनक-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील 

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार अतिशय चिंताजनक आहे. तपास यंत्रणा कुठे अपयशी ठरली हे तपास करून पाहीले जाईल. यासंदर्भात पोलिस आयुक्त व सह पोलिस आयुक्तांना सूचनाही दिल्या आहेत, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. मागील ५०-६० वर्षांमध्ये अशी घटना कुठेही घडलेली नाही. पवार साहेब सातत्याने लोकहिताचीच कामे करत आले आहेत. हा प्रकार संपूर्ण चुकीचा असून हे कदापि सहन केले जाणार नाही, असेही ते म्हणाले. राज्य सरकारने एसटीचे विलीनीकरण करणे शक्य नाही याची स्पष्टता केली होती. यानंतरही वेळोवेळी बैठका घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. काल न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार विलिनीकरण शक्य नाही. तरीदेखील दुसऱ्या दिवशी असे चुकीच्या पद्धतीने आंदोलन करणे हे कधीही मान्य होणारे नाही, असे त्यांनी सांगितले.