उद्योजकता विकासातून रोजगार निर्मितीसाठी कटीबद्ध- पालकमंत्री संदिपान भुमरे

छत्रपती संभाजीनगर,१७ ऑक्टोबर / प्रतिनिधी :- उद्योजकता विकासातून स्वयंरोजगाराला चालना देऊन रोजगार निर्मितीसाठी शासन कटीबद्ध आहे. त्या उद्देशानेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील नव उद्योजकांना यातून प्रेरणा मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यासंस्थेतर्फे प्रशिक्षण देण्यात आलेल्या व उद्योगासाठी कर्ज प्रकरणे मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना आज पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यकारी संचालक तथा उद्योग सहसंचालक बी.टी. यशवंते, विभागीय अधिकारी डी.यु. थावरे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती करुणा खरात, राजेंद्र जंजाळ आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी आपल्या संबोधनात संस्थेच्या प्रशिक्षण कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाधिक नव उद्योजकांची कर्ज प्रकरणे बॅंकेतून मंजूर व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आढावा घेऊन आपण पाठपुरावा करु. ‘उद्योजक’ हे मासिक ग्रामपंचायतस्तरावर पोहोचवून उद्योगाबाबत ग्रामपातळीवर जनजागृतीसाठी प्रयत्न होतील. संस्थेमार्फत प्रदर्शन केंद्र, प्रशिक्षण केंद्र, विक्री केंद्र अशा सुविधा उभारण्यास चालना देण्यात येईल. एक उद्योजक हा अनेकांना रोजगार देणारा असतो, त्यामुळे हा उद्योजकाता विकासातून रोजगार निर्मितीसाठी आपण कटीबद्ध आहोत. उद्योजक घडविण्याच्या संस्थेच्या कार्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविक विभागीय अधिकारी थावरे यांनी केले तर कार्यकारी संचालक यशवंते, राजेंद्र जंजाळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या नव उद्योजकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. श्रीमती सोसे यांनी सुत्रसंचालन केले. तर डॉ. अभिराम डाबीर यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत १६३ जणांची कर्जप्रकरणे मंजूर

महाराष्ट्र शासनाने सन २०१९-२० पासुन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या फ्लॅगशिप योजनेअंतर्गत कर्ज योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत विविध उद्योग व्यवसायासाठी कर्ज मंजुर झालेल्या लाभार्थी करीता संस्थेने २०२२-२३ पर्यंत एकूण ९००० लाभार्थीना निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण (सेवा व उत्पादन) दिले आहे.

 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण भौतिक १०९० उद्दिष्ट आहे. माहे सप्टेंबर २०२३ पर्यंत कर्ज मंजुर झालेल्या १६३ लाभार्थ्यांना एमसीईडी मार्फत प्रशिक्षण दिले आहे. २१०० अर्ज कर्ज मंजुरीसाठी विविध बँकेत सादर केले आहे. या योजनेअंतर्गत प्रकल्प किंमत कमाल मर्यादा सेवा उद्योगासाठी २० लाख रुपये  व उत्पादन उद्योगासाठी ५० लाख रुपये आहे. ही योजना राज्याच्या  विविध जिल्ह्यात एमसीईडी मार्फत राबविली जाते.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) ही महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेची स्थापना दि. १ ऑक्टोंबर १९८८ रोजी झाली असुन विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन सूकाणू परिषद द्वारे एमसीईडी संस्थेचे उद्योजकीय प्रशिक्षण व पूरक कामकाज गेल्या ३५ वर्षापासुन सुरु आहे. संस्थेचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे.

संस्थेत सर्व सुविधांनीयुक्त ५ प्रशिक्षण हॉल, १०० प्रशिक्षणार्थी राहू शकतील असे ४५ खोल्यांचे वसतीगृह, उपहारगृह, उद्योजकतेशी निगडीत ग्रंथालय आहे. संस्थेचे ८ स्वतंत्र विभागीय कार्यालये असून जिल्हा उद्योग केंद्रामध्ये संस्थेचे जिल्हा कार्यालये आहेत. संस्थेचा प्रमुख उद्देश महाराष्ट्रात उद्योजकतेचा प्रचार पसार व विकास करणे आहे. तसेच या संस्थेचे ‘उद्योजक’ नावाचे मासिक नियमितपणे प्रकाशित होत असून उद्योजकीय मन घडविणारे महाराष्ट्रातील हे एकमेव मासिक आहे. संस्थेने दरवर्षी ७० हजार युवक-युवतींना उद्योजकतेशी निगडीत विविध प्रशिक्षण दिले असुन दि. ३१ मार्च २०२३ पर्यंत संस्थेने एकूण १६,४९,५११ लाभार्थींना प्रशिक्षीत केले आहे. प्रशिक्षणामधून सरासरी ४० टक्के प्रशिक्षणार्थीनी स्वतःचे उद्योग/व्यवसाय सुरु केले असून स्वतःच्या आर्थिक स्वावलंबनासोबतच इतरांनाही रोजगार देवून राज्याच्या आर्थिक विकासात मोठे योगदान दिले आहे.

एमसीईडीमार्फत राबविले जाणारे प्रशिक्षण कार्यक्रम:-

  • उद्योजकता परिचय कार्यक्रम
  • किरकोळ व्यापार व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम
  • उद्योजकता विकास कार्यक्रम
  • निवासी-उद्योजकता विकास कार्यक्रम
  • तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रम
  • निवासी (उद्योग व्यवसाय) तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रम
  • स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण कार्यक्रम
  • कौशल्यावर आधारित प्रात्यक्षिक प्रशिक्षण
  • व्याख्याते विकास कार्यक्रम
  • संस्था वृध्दी / विकास कार्यक्रम
  • प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम
  • उद्योजकता अभिमुखता कार्यक्रम
  • समन्वयक प्रशिक्षण कार्यक्रम
  • व्यवस्थापन विकास प्रशिक्षण
  • कामगिरी सुधारणा कार्यक्रम
  • संस्था विकास कार्यक्रम
  • विशेष प्रकल्प (गरजेनुसार)