मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ.अविनाश येळीकर यांचे दुःखद निधन

छत्रपती संभाजीनगर,२  एप्रिल / प्रतिनिधी :-  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ.अविनाश येळीकर यांचे आज रविवार दि.२ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले.

डॉ. अविनाश येळीकर यांच्या पार्थिवावर सोमवार दि. ३ एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ.अविनाश येळीकर हे प्रदीर्घ काळापासून मशिप्र मंडळात आपले योगदान देत होते.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून दहा वर्ष त्यांनी उत्तम कार्य केले होते.विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.यासह आरोग्यक्षेत्रात मराठवाड्यात प्लास्टिक सर्जन म्हणून त्यांचा नावलौकिक होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांचे पती होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा,मुलगी जावई,सून असा परिवार आहे .

आमदार सतीश चव्हाण यांची प्रतिक्रिया-

डॉ.अविनाश येळीकर यांनी शैक्षणिक क्षेत्रा बरोबरच वैद्यकीय क्षेत्रातील एक मान्यवर तज्ज्ञ म्हणूनही मोठा लौकिक प्राप्त केला होता. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात काम करत असताना विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि प्रशासन या सर्व घटकांचा विचार करून निर्णय घेण्याची त्यांची क्षमता होती. त्यांच्या कार्यशैलीचा मंडळातील या सर्वच घटकांना मोठा लाभ झालेला आहे. त्यांच्या सक्रिय योगदानाला मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ कदापी विसरू शकणार नाही. मंडळाच्या जडणघडणीतील एक मार्गदर्शक सहकारी आज आम्ही गमावला आहे. डॉ.अविनाश येळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!