वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्याच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना मोफत जेवण

वैजापूर ,२५ जून  /प्रतिनिधी :- येथील उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसोबत  एक ते दोन नातेवाईक असतात. रुग्णांना दवाखान्यामार्फत जेवण दिले जाते. मात्र नातेवाईक यांची हेळसांड होते. हे लक्षात घेऊन शिवूर येथील श्री. शंकर स्वामी ट्रस्टच्या नावे जे देणगीदार पंधराशे रुपये देणगी देतील त्यांच्या या रकमेतून रुग्ण नातेवाईक यांना दररोज एक वेळ जेवण दिले जाणार आहे.

नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान, माजी नगराध्यक्ष राजुसिंह राजपूत व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी प्रत्येकी पंधराशे रुपये तात्काळ देऊन ही अन्नदान योजना उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी माजी उद्योग संचालक जे. के.  जाधव व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली. या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ‌.गजानन टारपे, मुख्य सेविका भुईनगळ, प्राचार्य विष्णु भिंगारदेव, प्राचार्य भुजाडे, योजनेचे प्रमुख पंकज साळुंके, मंगेश भागवत, शिरीष चव्हाण उपस्थित होते. आयोजन जे.के.जाधव मित्र मंडळ व शिवसेना यांनी केले.

तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी शिवूर येथील श्री. शंकर स्वामी ट्रस्टच्या नावे पंधराशे रुपयांचा धनादेश जमा करावा व अन्नदान साठी पुढे यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले