वैजापूर येथील नौगाजीबाबा उरूस ५ मे पासून

उरुसानिमित सलग तीन दिवस कव्वालीचा कार्यक्रम 

वैजापूर ,३ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर येथील सर्वधर्मसमभावाचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या हजरत सैय्यद शाह रुकनुद्दीन उर्फ नौगाजी बाबा यांच्या ऊरुसास पाच मे पासून प्रारंभ होत आहे. ऊरुसानिमित्त येथील नौगाजी बाबा यांच्या दर्गा परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन ऊरुस समितीतर्फे करण्यात आले आहे.

या ऊरुसानिमित्त नौगाजी बाबांच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतील मोठ्या प्रमाणावर भाविक येत असल्याने ऊरुस समितीसह नगरपालिकेच्यावतीने पिण्याच्या पाण्यासह विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. पाच में रोजी दुपारी तीन ते रात्री दहा या वेळेत संदल शरीफची मिरवणूक काढण्यात येणार असून यात नागरिकांना प्रसिध्द ब्रॉस बॅंडचा मुकाबला बघायला मिळणार आहे. ६ ​मे रोजी सायंकाळी सहा वाजता रियाज वारसी व छोटी आरजु यांच्यात कव्वालीचा मुकाबला रंगणार आहे. वैजापूर येथील करीम बेग दारुवाले यांच्या शोभेच्या दारुची आतषबाजी बघायला मिळणार आहे. तर ७​ मेंरोजी दुपारी चार वाजता जंगी कुस्त्यांचा मुकाबला व सायंकाळी अजिम नाजा व परवीन रंगिली यांच्यातील कव्वालीचा मुकाबला कव्वाली रसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे. तर तिसऱ्या दिवशी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्यातर्फे प्रसिध्द कव्वाल मुन्नवर मासुम व तनवीर कौसर यांचा कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कृष्णा लॉन्स येथे हा कार्यक्रम होणार आहे.

वैजापूरचे आमदार रमेश पाटील बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान, भाऊसाहेब ठोंबरे, काजी हाफिजोद्दिन, डॉ. दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती, एकनाथ जाधव, अकिल शेख, सचिन वाणी, मजीद कुरेशी, सय्यद हिकमत, राजुसिंह राजपूत,  काझी मलिक यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ऊरुस समितीने केले आहे.