वैजापूर तालुक्यात 87.6 मि.मी.पाऊस ; खरीप पेरण्यांना सुरुवात

1लाख 35 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी अपेक्षित

वैजापूर ,२५ जून  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात काही कृषी मंडळात पहिल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पेरण्यांना सुरुवात केली आहे. यात जमिनीतील कमी ओलाव्यावर वाढू शकणाऱ्या मका या पिकाचा समावेश असून दुसरा पाऊस झाला तर या पेरण्या जगतील अशी अपेक्षा आहे.

यावर्षी बाजारात मका, कापुस, सोयाबीन या पिकांसह सर्वच भुसार भावालाही चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था असल्याचेचित्र आहे. असे असले तरी शेतकऱ्यांचा कल कापूस, मका या रोख पिकांशिवाय सोयाबीनकडेही आहे. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामात मकाच्या क्षेत्रात किंचित घट होऊन कपाशी व सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे.

दरम्यान वैजापूर तालुक्यातील वैजापूर, लाडगावं, नागमठाण, महागाव, लासुरगाव, लोणी, शिऊर, गारज, फोर्स, खंडाळा या दहा मंडळात 25 जूनपर्यंत सरासरी 87.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पेरणी करण्यासाठी सरासरी 75 ते 100 मि.मी. पावसाची आवश्यकता असते. त्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये असे आवाहन तालुका कृषि अधिकारी अशोक आढाव यांनी केले आहे. पहिल्या पावसावर तालूक्यातील महालगाव व खंडाळा मंडळात शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली आहे. 

तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 526 मि.मी.आहे. खरीपामध्ये एक लाख 35 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. यात कपाशीचे साधारणपणे 68 हजार हेक्टर क्षेत्र असून मका 37 हजार 622 हेक्टर, बाजरी चार हजार 759 हेक्टर, सोयाबीन पाच हजार 713 हेक्टर, भुईमुग दोन हजार 396 हेक्टर, मुग चार हजार 18 हेक्टर व उडीद 78 हेक्टर क्षेत्र आहे.  तालुक्यामध्ये पुरेसे बियाणे व खते उपलब्ध आहेत.

शेतकऱ्यांनी दुकानदाराकडूनच बियाणे, खते व औषधी खरेदी करावेत. दुकानदारांकडून पक्के बिल घ्यावे. बॅग वरील किमतीपेक्षा जादा रक्कम देऊ नये. बियाण्याची पिशवी, लेबल व बिल जपून ठेवावे. बियाणे/खते/औषधी बाबत काही तक्रार असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. पेरणी करताना रासायनिक, तसेच जैविक बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. रासायनिक खतांचा जमीन सुपीकता निर्देशांकानुसार संतुलित वापर करावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आढाव यांनी केले आहे.