वैजापुरात काँग्रेसची आढावा बैठक : पक्ष संघटना बळकट करण्याचे आवाहन

वैजापूर ,२४ जून/ प्रतिनिधी :-ज्यांना कॉग्रेसने मोठे केले, पदे दिली ते स्वार्थासाठी पक्षाला सोडून गेले.‌ पण अजूनही तालुक्यात कॉग्रेस पक्षाचा मतदार आहे. या मतदारांच्या माध्यमातून आगामी काळात कॉग्रेस बळकट करु.‌ जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत कॉग्रेसला विजय मिळवून देऊ अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांनी दिली.

प्रदेश कॉग्रेस समितीच्या निर्देशानुसार, येथील वैजापूर मर्चंट बॅकेच्या सभागृहात मतदार संपर्क अभियान, बुथ कमिटी व मंडळ कमिटी निवडीसाठी शनिवारी (ता.24) तालुका कॉग्रेस कमिटीची बैठक घेण्यात आली. जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष डॉ.कल्याण काळे अ़ध्यक्षस्थानी होते. या बैठकीला ग्रामीण जिल्हा कॉग्रेस प्रभारी मुजाहिद खान, संपर्क अभियान समन्वयक हेमंत ओगले, सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे, नामदेव पवार, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष तांबे, तालुकाध्यक्ष प्रशांत सदाफळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

संचेती म्हणाले, कॉग्रेससह मित्र पक्षांची राज्यात व देशातील परिस्थिती सुधारत आहे‌‌. कॉग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात कॉग्रेसने तळागाळातील मतदारांपर्यंत पोहचून विजय मिळवला आहे. त्याच धर्तीवर कॉग्रेस आगामी काळात विजय मिळवेल. वैजापूर मतदारसंघात पक्ष बळकट करण्यासाठी लवकरच समित्यांची स्थापना करण्यात येईल असे संचेती यांनी सांगितले.

यावेळी डॉ.‌कल्याण काळे, प्रशांत सदाफळ यांनीही मार्गदर्शन केले.‌ बैठकीला शहराध्यक्ष काजी मलिक, लक्ष्मण पवार, सागर थोट, रोहित आहेर, शाक्यसिंह त्रिभुवन, साहेबराव पडवळ, प्रवीण जाधव, दिगंबर वाघचौरे, प्रदीप जाधव, सुनिल बोडखे, विकास सोमवंशी, सुशिल आसर, बाबासाहेब गायकवाड, मधुकर साळुंके आदींची उपस्थिती होती.