वैजापुरात कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा ;५८ जनावरांची सुटका

वैजापूर ,२४ जून/ प्रतिनिधी :- शहरातील खाण गल्ली भागात सुरू असलेल्या कत्तलखान्यावर पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकून  ५८ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली तसेच विक्रीसाठी ठेवलेले दोन क्विंटल मांस जप्त केले.
ही कारवाई वैजापूर उपविभागाच्या पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या पथकाने शुक्रवारी केली. या कारवाईत जवळपास दोन क्विंटल जनावरांचे विक्रीसाठी ठेवलेले मांस व  ५८ जनावरे असा सोळा लाख ३५ हजार ४५०​ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.‌ पोलिसांनी कारवाईतील  ५८ निष्पाप जनावरांना वैद्यकीय तपासणी करुन तालुक्यातील हडसपिंपळगाव येथील रेणुका माता गोशाळेत सुरक्षितरित्या हलवले आहे. 

वैजापूर शहरातील खाण गल्ली भागात बेकायदा कत्तलखाने चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक निशा बनसोड, पोलिस उपनिरीक्षक श्रीराम काळे, गोलवाल, मोटे, पैठणकर आदींच्या पथकात समावेश होता.

या प्रकरणी १३ जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय लोहकरे हे करीत आहेत.‌