कापुसवाडगाव येथे मोबाईल व कापड दुकान फोडून 72 हजारांच्या साहित्याची चोरी

वैजापूर,९ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-अज्ञात चोरांनी मोबाईल व कापड दुकान फोडून दुकानातील विविध प्रकारचे मोबाईल मोबाईल सामान व कपडे असा एकूण 72 हजार रुपयांचा माल लंपास केला. ही घटना वैजापूर तालुक्यातील कापुसवाडगाव येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी विरगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कापुसवाडगाव या गावात छत्रपती शिवाजीराजे महाराज यांच्या पुतळ्यासमोर बाळासाहेब निगळ यांचे कापड दुकान असून त्यातील अर्धी जागा त्यांनी गावतीलच कृष्णा घोंगते यांना भाड्याने दिली आहे. या जागेत कृष्णा यांनी मोबाईल शॉपी टाकले असून दोन्ही दुकाने तेच सांभाळतात. सोमवारी सकाळी सात वाजता दुकान उघडून रात्री दहा वाजता बंद करून ते घरी गेले. मात्र मंगळवारी सकाळी सात वाजता त्यांना दुकान शेजारी असलेले  बाळासाहेब वैद्य यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले कि तुमच्या दुकानाच्या मागील बाजूचा ही पत्रे उचकटले असून सामान बाहेर पडलेले आहे. त्यानंतर कृष्णा यांनी तातडीने बाळासाहेब निगळ यांना याबाबत कळवले.  तेव्हा त्यांनी दुकानात जाऊन बघितले असता दुकानातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. दोन्ही दुकानातील सामान चोरी झाल्याचे आढळून आले. लहान मुलांचे रेडीमेड ड्रेस, अंडरवेअर, बनियन, साड्यांचे बॉक्स,  केडियम कंपनीचे चार्जर, ब्लूटूथ, हेडफोन,चार्जिंग कॉर्ड, जिओ कंपनीचे चार्जर्स, एक सीसीटीव्ही कॅमेरा, होम थिएटर असा ७२ हजार रुपये किमतीचा माल चोरट्यांनी लंपास केला. पोलीस पाटील गणेश कदम व गावकऱ्यांनी दुकानाला भेट दिली. दरम्यान,  याप्रकरणी बाळासाहेब निगळ यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध विरगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.