भाजपविरोधात देशातील विरोधक एकवटले ; पाटण्यात देशातल्या १५ विरोध पक्षांची बैठक

पाटणा :-आज बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या पुढाकाराने पाटणा येथे देशाच्या १५ विरोधी पक्षांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच देशातल्या विरोधी पक्षांनी किमान समसमान कार्यक्रमाची तयारी करण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत दिल्लीतील अध्यादेशावर काँग्रेसने राज्यसभेत आपच्या बाजूने समर्थन द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी केल्याची माहिती आहे.

image.png

मोदी हुकूमशाहप्रमाणे देशाचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच आमच्यात काही मतभेद असतील पण सर्वांना एकत्रित करुन तसंच सर्वांचे विचार एकत्र घेऊन जाणार असल्याचं ते म्हणाले.

यावेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पाटण्याहून सुरु झालेली आंदोलने मोठी झाली हा इतिहास आहे. त्यामुळे ही बैठक दिल्लीत नाही तर पाटण्यात घेण्याचा विचार मी मांडला. आम्ही सर्व एक असून एकत्रित लढणार आहोत. आम्हीही देशभक्त आहोत. भाजपच्या हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र येत आहोत, असं त्यांनी म्हटलं.

देशात सांप्रदायिक वातावरण करण्याचा प्रयत्न सुरु झाला असून आता आपल्याला भाजपचा सामना करायचा असेल तर एकत्र येऊन करायला हवा, असं पवार म्हणाले आहेत. तसंच जयप्रकाश यांच्या नेतृत्वात पाटण्यातून सुरु झालेलं आंदोलन देशात पोहचलं होतं. आता देखील हेच होताना पाहायला मिळेल, असं देखील ते म्हणाले.

मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू – काश्मीरमध्ये जी परिस्थिती आहे तीच आता देशभरात असून गांधी नेहरुंच्या विचाराच्या या देशाला वाचवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमची मत मतांतरे असतील, परंतु देश एक आहे. स्वातंत्र्यावर जो आघात करेल त्याला आम्ही मिळून विरोध करू, देशात तानाशाही आणायचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही विरोध करत राहू. अशा बैठका आता सातत्याने होताना पाहायला मिळतील, असं म्हटलं आहे.

विरोधी पक्षांची पुढची बैठक शिमल्याला होणार असून त्याची तारीख अद्याप निश्चित नाही. १२ किंवा १३ जूलै रोजी ही बैठक होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.

‘दाढी वाढवू नका, लग्न करा’, लालू प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधींना सल्ला

राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी अनेक वर्षानंतर राजकीय पक्षांच्या मोठ्या मेळाव्यात दिग्गज नेत्यांना सामील करून घेतले. पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत मोठ्या मंचावर लालू एकत्र दिसले, तेव्हा त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवताना आपल्या जुन्या शैलीत अनेक गोष्टी सांगितल्या. लालूप्रसाद यादव यांनी त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगत भाजपला टोला लगावला. लालू म्हणाले की, खूप दिवसांनी तुमच्याशी बोलत आहे. आम्ही पूर्णपणे तंदुरुस्त झालो आहोत, आता भाजपला फिट व्हायचे आहे.

लालूंनी भाजपला टोला लगावला

विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर लालू प्रसाद यादव यांनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल करत महागाईच्या वाढीवर आपल्या खास शैलीत प्रश्न उपस्थित केले. लालू म्हणाले की, आम्ही भेंडी खरेदी करायला जात नाही, पण आम्हाला ६० रुपये किलो भेंडी मिळत असल्याचे कळले. भाजपवर टीका करताना लालू म्हणाले की, भाजप हिंदू मुस्लिमाचा नारा देत आहे. जय हनुमानाचा नारा देत लढाई लढतो. राहुल गांधींच्या पक्षाने जिंकलेल्या गदा हनुमानजींनी मारली. आता हनुमानजी आमच्यासोबत आहेत. या बैठकीद्वारे सर्व नल नील गोळा केले जात आहेत.

राहुल गांधींचा उल्लेख करत लालू प्रसाद यादव म्हणाले की, राहुल गांधींनी आजकाल चांगले काम केले आहे. पायी भारताला भेट दिली. लालू गंमतीने म्हणाले की, त्यांनी दाढी वाढवली होती, आता ती कापली आहे. नितीशजींचे मत म्हणजे दाढी लहान करा. राहुलच्या लग्नाचा संदर्भ देत लालू म्हणाले की, अजून वेळ गेलेली नाही. तुम्ही लग्न करा, आम्ही वरातीत येतो. ते म्हणाले की, तुमची आई (सोनिया गांधी) म्हणायची की आमचे ऐकत नाही, लग्न करा. आता तू लग्न कर. लग्नाच्या वरातीत जाऊ. लालूंनी हे बोलताच संपूर्ण खोली हास्याने गुंजली.