मोदी हटाओ नही, परिवार बचाओ बैठक-देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका

उद्धवजी मेहबूबा मुफ्तींच्या सोबत कसे? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

मुंबई :-जम्मू-काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत गेलो म्हणून भाजपला सातत्याने टोमणे मारणारे उद्धव ठाकरे हे आज त्यांच्याच बाजूला बसलेले दिसले. त्यांच्यासोबत आता ते आघाडी देखील करणार आहेत. त्यांच्या आघाडीला मोदी हटाव आघाडी, असे नाव दिले आहे. पण, ही केवळ परिवारवादी पक्षांनी बनविलेली परिवार बचाव आघाडी असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. हे कितीही पक्ष एकत्र आले तरी २०२४ मध्ये भाजप आणि रालोआच सगळयात जास्त जागा घेउन सरकार बनविणार असल्याचेही ते म्हणाले. मुंबईतील कोविड घोटाळयात ज्यांनी प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे त्यांना सोडण्यात येणार नाही. त्यात जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच पण त्याचवेळी निरपराध अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात येणार नाही, असा विश्वासही त्यांनी दिला.

‘‘जे विरोधी पक्ष आता मोदी हटावचा नारा देत एकत्र येत आहेत, ते केवळ परिवारवादी आहेत. आपल्या कुटुंबालाच सत्ता मिळावी यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘जे उद्धव ठाकरे नेहमी भाजपला मेहबूबा मुफ्तींचे नाव घेऊन टीका करायचे. आज तेच उद्धव ठाकरे हे त्या मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसलेले दिसून आले. त्यांच्यासोबतच ते आघाडीही करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नउ वर्षांत जे कार्य केले आहे ते पाहता देशातील जनता मोदींच्याच पाठिशी उभी राहणार याची कल्पना या पक्षांना आली आहे. या पक्षांनी २०१९ मध्येही हा प्रकार करून पाहिला होता. पण त्यावेळी त्यांना अपयश आले. आता २०२४ मध्येही याचीच पुनराव़त्ती होणार आहे. कितीही मेळावे यांनी घेतले तरी जनता यांच्यासोबत जाणार नाही असेही फडणवीस म्हणाले.