माजी आमदार चिकटगावकर यांच्या हाती शिवबंधन: वैजापूर तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला बळ मिळणार

चिकटगावकरांनी ‘घड्याळाला’ सोडचिठ्ठी देऊन ठाकरे सेनेची ‘मशाल’ घेतली हाती

मुंबईत ‘मातोश्रीवर’ उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा

जफर ए. खान

वैजापूर,१४ डिसेंबर :-काँग्रेस नेत्यांसह त्यांच्या दोन पुतण्यांचा झालेला राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे चिकटगावकरांनी ‘घड्याळाला’ सोडचिठ्ठी देऊन ठाकरे सेनेची ‘मशाल’ हाती घेतली. मुंबईत मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत समर्थकांसह आज त्यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. चिकटगांवकर यांनी शिवबंधन हाती बांधल्यामुळे वैजापूर तालुक्यात ठाकरे सेनेला बळ मिळणार आहे.

मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते सुभाष देसाई, मराठवाडा संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिनकर पवार, बाजार समितीचे माजी सभापती प्रतापराव धोर्डे, खरेदी विक्री संघाचे उपसभापती मंजाहरी गाढे, पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र मगर, प्रभाकर बारसे, बाजार समितीचे माजी उपसभापती रिखबचंद पाटणी, साईनाथ मतसागर, उत्तम निकम, अण्णाभाऊ चौधरी, संजय सूर्यवंशी, प्रशांत शिंदे, राजीव साळुंके, मच्छिंद्र त्रिभुवन, अब्दुल सलाम अहमद बागवान आदींनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला.

शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख प्रकाश चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, बाजार समितीचे माजी सदस्य भाऊसाहेब पाटील गलांडे, मोहनराव साळुंके, विठ्ठल डमाळे, राजू गलांडे, अनिल वाणी आदी यावेळी उपस्थित होते. 

काँग्रेस नेते भाऊसाहेब ठोंबरे यांच्यासह त्यांचे पुतणे विजय ठोंबरे व पंकज ठोंबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचे कवित्व जून महिन्यापासून सुरू होते. हा प्रवेशसोहळा रोखण्यासाठी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु हा प्रवेशसोहळा रोखण्यासाठी त्यांना यश आले नाही. गेल्या महिन्यातच चिकटगावकरांना डावलून ठोंबरे काका – पुतण्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबई येथे त्यांना प्रवेश देऊन चिकटगावकरांना सणसणीत चपराक दिली.

या प्रवेशसोहळ्याचे खापर चिकटगावकरांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यावर फोडून त्यांनी संतापाला वाट मोकळी करून दिली. वास्तविक पाहता चिकटगावकर व समर्थकांचा पहिल्यापासूनच टोकाचा विरोध होता. परंतु विरोधासाठी केलेली त्यांची झुंज अपयशी ठरल्यानंतर त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क मोहीम सुरू करून मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या दौऱ्यात त्यांना मतदारांनी ठाकरेसेनेची ‘मशाल’ हाती घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे चिकटगावकरांनी त्या दिशेने पावले उचलण्यास सुरवात करून ठाकरेसेनेच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यावरून चिकटगावकर ठाकरेसेनेत प्रवेश करण्याचे संकेत मिळाले होते.  ठाकरेसेनेच्या  स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची पक्षप्रवेशासाठी अनुकुलताही तेवढीच महत्त्वाची असल्यामुळे आतापर्यंत ‘जुळवाजुळव’ सुरू होती. या पक्षप्रवेशासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची शिष्टाई महत्त्वाची ठरली अन् स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनीही सहमती दर्शविल्याने चिकटगावकरांना पक्षप्रवेश सोपा झाला. 

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी झाली तर आघाडी झाली तर वैजापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार नाही. कारण गेल्या निवडणुकीत ठाकरे सेनेच्या उमेदवाराने बाजी मारली होती. त्यामुळे चिकटगावकरांनी पुढील राजकीय आडाखे बांधून हा प्रवेश केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.