ठोंबरे बंधूच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाला तात्यांचा “खो” ; प्रवेश सोहळा लांबणीवर

विरोध असला तरी माझा प्रवेश निश्चित – पंकज ठोंबरे

वैजापूर ,१६ जून  /प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे ठोंबरे बंधू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन दुजोरा दिला आहे. पक्षश्रेष्टींशी आपली चर्चा झाली असून आपला राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित असल्याचे श्री.ठोंबरे यांनी सांगितले आहे. मात्र तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा ठोंबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाला विरोध असून त्यांनी पक्षश्रेष्ठींची मुंबईत भेट घेऊन ठोंबरें बंधूंना पक्षात घेण्यास विरोध दर्शविला आहे. ठोंबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाला तात्यांनी “खो” दिल्यामुळे ठोंबरे यांचा नियोजित प्रवेश सोहळा लांबणीवर पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांच्या राष्ट्रवादी  काँग्रेस पक्षात प्रवेश देऊ नये यासाठी तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (तात्या) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली व विरोधाची भुमिका दर्शवल्यामुळे ठोंबरेच्या नियोजित  प्रवेश समारंभाला अजितदादांनी तुर्तास “ब्रेक” दिल्याची चर्चा आहे.

15 जून ही तारीख जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल होण्याची निश्चित झाली होती.दरम्यान या प्रवेशास माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर समर्थकांनी तीव्र  विरोधाची भुमिका घेतली. रविवारी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यासह शिष्टमंडळाने जालना जिल्ह्यात घनसावंगी येथे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन त्यांना पक्षात नवीन लोकांना प्रवेश दिल्यास पक्षात कार्यरत पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा देण्याचा टोकदार इशारा दिला. ना.टोपे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत ठोंबरे यांच्या प्रवेशामुळे निर्माण झालेल्या वादासंदर्भात माहिती पोहचवली. या शिष्टमंडळाला त्यांनी चर्चेसाठी  मंगळवारी मुंबईत बोलावून उपमुख्यमंत्री अजित पवाराशी त्यांची भेट घडवून आणली तब्बल पाऊण तास अजित दादा पवार यांनी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. यानंतर त्यांनी शिष्टमंडळात त्यांच्यासोबत गेलेले बाजार समितीचे सभापती भागीनाथ मगर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अँड प्रताप निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती प्रभाकर बारसे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष मंजाहरी गाढे, उत्तमराव निकम, साईनाथ मतसागर, शैलेश सुराशे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. दरम्यान चिकटगावकर व अजित पवार यांच्यात बंद दाराआड  चर्चेनंतर काॅंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य  पंकज  ठोंबरे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाला ब्रेक लागल्याची चर्चा आहे. तर भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी उभ्या आयुष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत अडचणीच्या काळात उभे राहून केलेल्या कामाची दखल पक्षाने घेतली अशी चर्चा कार्यकर्त्यांत आहे.
स्थानिक पातळीवर काही ठराविक मंडळींचा माझ्या प्रवेशास विरोध असला तरी पक्षश्रेष्टींनी माझ्या प्रवेशास हिरवा कंदील दाखविला असून विधान परिषद निवडणूकीनंतर प्रवेश सोहळा होणार होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे पत्रपरिषदेत सांगितले