स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी सरकारमधून सोडचिठ्ठी

कोल्हापूर,५ एप्रिल  /प्रतिनिधी :- गेली दोन वर्षे राज्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत टीकेची झोड उठवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अखेर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत मंगळवारी अधिकृत घोषणा केली.

शेतकऱ्यांना महापुरातील नुकसान भरपाई, दिवसा वीज, कर्जमाफी, प्रामाणिक शेतकऱ्यांना अनुदान अशा विविध मागण्या संघटनेने सरकारकडे केल्या होत्या. या सर्व मागण्याबाबत फारशी सकारात्मक भूमिका सरकारने घेतला नसल्यानेच आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा शेट्टी यांनी केली.शेट्टी यांच्या या घोषणेने महाविकास आघाडीला पहिला धक्का बसला आहे. अडीच वर्षात प्रथमच आघाडीतून एक पक्ष बाहेर पडला आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन्ही काँग्रेसबरोबर आघाडी केली. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होताना संघटना या आघाडीत सहभागी झाली होती.