बाहेर वेगळे पण आतून सगळे एकच-राज ठाकरे

राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन

नाशिक ,९ मार्च / प्रतिनिधी :-:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार आणि अजित पवार गट बाहेर वेगळे, पण आतून सगळे एकच आहेत, असा मोठा दावा केला आहे. मनसेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी राज ठाकरेंनी सर्वच राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला.

राजकारणामध्ये टिकायचे असेल तर ‘संयम’ महत्त्वाचा आहे, हा मूलमंत्र देताना पक्षात जातीपातीला थारा नसेल, असेही राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. सध्या राज्यात सुरू असलेले राजकारण म्हणजे अळवावरचे पाणी आहे. आपल्याला यश मिळणार थोडा संयम ठेवा, असे म्हणताना त्यांनी ‘मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत. आणि तेवढी धमक मी ठेवतो’ असे सूचक वक्तव्य केले.

राज ठाकरे यांनी म्हटले की, राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते मला भेटण्यासाठी आले होते. तेव्हा सांगताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे त्यांनी मला सांगितले, म्हणून कोणत्या गटाचे विचारले तर, तीन शरद पवार, दोन अजित पवार गटाचे होते, पण भेटायला मात्र एकत्र आले होते. माझे ठाम मत आहे, हे सर्व आतून एक आहेत, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

लोकसभा निवडणूका आता अगदी कधीही जाहीर होऊ शकतात अशी स्थिती आहे. काही पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. अशात मनसे महायुती मध्ये सहभागी होण्याबाबत आज राज ठाकरे काही घोषणा करतात का? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र त्याबाबत निवडणूकांमध्ये बोलणार आहोत आणि अन्य विषयांवर सविस्तर ९ एप्रिलला गुढी पाडव्याच्या दिवशी शिवतीर्थ मैदानावर आपण बोलू, असे ते म्हणाले.

मनसेच्या स्थापनेनंतर यंदा पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी नाशिक मध्ये मनसेचा वर्धापन दिन सोहळा आयोजित केला होता. या निमित्ताने ते ३ दिवसीय नाशिक दौर्‍यावर आले आहेत. काल महाशिवरात्री दिवशी त्यांनी काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती देखील केली.

मनसेच्या १८ वर्षांच्या प्रवासात अनेक चढ उतार आले पण या प्रवासात साथ दिलेल्या त्यांच्या सहकार्‍यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी राज्यात खऱ्या अर्थांने जर कोणते पक्ष स्थापन झाले असतील तर, त्यात पहिला जनसंघ, शिवसेना आणि त्यानंतर मनसे हा पक्ष आहे, असे सांगितले. एनसीपी म्हणजे शरद पवारांनी निवडून येणार्‍या लोकांची बांधलेली मोळी आहे, असे म्हणत पुन्हा त्यांच्यावर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही. निवडून येणाऱ्या माणसांची मोळी आहे. शरद पवार हेच करत आलेत. ते वेगळे झाले तरी निवडून येणार, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

‘अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक अजून का झाले नाही’

राज ठाकरे म्हणाले की, अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक अजून का झाले नाही. पंतप्रधान आले फुले वाहून गेले, त्या फुलांचे काय झाले. पण त्या वेळेत वल्लभभाई पटेल याचा पुतळा उभा राहिला.

अरबी समुद्रातील शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्याचा विषय आला, तेव्हा मी सांगितले असे होणार नाही. समुद्र आहे, तिथे भर घालण्यासाठी किमान २५ ते ३० हजार कोटी लागतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले गड किल्ले स्मारक आहे. येणाऱ्या पिढीला पुतळे दाखविणार का, असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला. गड-किल्ले उभे राहिले तर इतिहास दाखवू शकू, असेही त्यांनी म्हटले.

मनसे सुरू करते तसा शेवटही करते. आमची भूमिका स्वच्छ प्रामाणिक होती व आहे. उद्धव ठाकरेचे (Uddhav Thackeray) सरकार होते त्यावेळी राज्यातील १७ हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. आणि हे स्वत:ला हिंदुत्वावादी समजतात. काय चुकीचे केले होते. प्रार्थना स्थळावरील भोंगे काढले. प्रार्थना करू नका, असे आम्ही म्हणत नाही. आपल्या आंदोलनानंतर सर्व बंद झाले होते पण सरकार ढीले पडल्यानंतर पुन्हा सुरु झाले, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.