राज्यपालांना दिल्लीचे समन्स: शिवछत्रपतींविषयीच्या वक्तव्याची दखल

मुंबई ,२३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मंगळवारी दिल्लीने बोलावणे धाडले आहे. राज्यपालांच्या शिवछत्रपतींविषयीच्या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण प्रचंड तापले असून, त्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. छत्रपती घराण्याचे वंशज आणि महाविकास आघाडीने एकमुखाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल कोश्यारी यांना तातडीने दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे. राज्यपाल २४ आणि २५ नोव्हेंबरला दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे राज्यपालांना दिल्लीतून केवळ समज दिली जाणार की त्यांच्यावर काही कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यापासून भगतसिंह कोश्यारी नेहमीच चर्चेत राहिले आहेत. मराठीतून शपथ घेणारे राज्यपाल म्हणून त्यांनी वेगळेपण सिद्ध केले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारशी नेहमीच त्यांचे या ना त्या कारणाने खटके उडत राहिले. जाहीर कार्यक्रमातील त्यांची वक्तव्ये अनेकदा वादास कारण ठरली. समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने कोश्यारी काही दिवसांपूर्वी अडचणीत आले होते. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयीच्या वक्तव्यामुळेही त्यांच्यावर टीका झाली होती.

नुकतीच औरंगाबाद येथील विद्यापीठाच्या कार्यक्रमातही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद‌्गार काढल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. “आम्ही जेव्हा शाळेत जायचो, तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे, तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या-त्या व्यक्तींचे नाव घ्यायचे. मला असं वाटतं की, जर कुणी तुम्हाला विचारले की तुमचे आवडते हीरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. महाराष्ट्र नवरत्नांची खाण आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील,” असे राज्यपाल म्हणाले होते. त्याला सर्वच राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. विविध सामाजिक संघटनांनाही राज्यपाल हटाव मोहीम उघडली आहे.

समज देणार की कारवाई?

या सर्व घडामोडींची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून, राज्यपाल कोश्यारी यांना दिल्लीला येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या २४ आणि २५ तारखेला ते दिल्लीला जाणार आहेत. यावेळी ते नेमके कोणाला भेटणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गृहमंत्री अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी कोश्यारी यांची कानउघाडणी होण्याची शक्यता आहे. भाजपचे केंद्रीय नेतृत्व कोश्यारी यांना पदमुक्त करण्याच्या दृष्टीने काही पावले टाकतील, अशीही चर्चा आहे.