शिंदे गट भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता ; जे. के. जाधव यांचे पत्रकार परिषदेत सूतोवाच

स्थानिक पातळीवर भाजमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा

वैजापूर विधानसभेच्या उमेदवारीसाठी माझी ‘लाॅटरी’ लागू शकते-जे. के. जाधव

वैजापूर,११ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट भाजपमध्ये विलिनीकरण होण्याची शक्यता आहे. भाजपकडून विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढविण्यासाठी स्थानिक पातळीवर मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे  विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी  माझी ‘लाॅटरी’ लागणार असल्याचे सुतोवाच राज्याचे माजी उद्योग संचालक तथा शिंदे गटाचे जे. के. जाधव यांनी वैजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. 

येथील पंचायत समितीच्या व्यापारी संकुलाच्या गाळ्यात जे. के. जाधव यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी विविध विषयांवर उहापोह करण्यात आला. ते म्हणाले की, शेतकरी, उद्योजकांना कर्ज मिळण्यासाठी अनेक बॅंकांकडुन टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये महाराष्ट्र बॅक, महाराष्ट्र ग्रामीण बॅक, बॅक ऑफ बडोदा, एचडीएफसी या बॅकांच्या सर्वाधिक तक्रारी असून आपण संबंधित बॅंकाशी संपर्क साधुन पाठपुरावाअसूनीत आहोत. बॅकांनी कर्ज प्रकरणांचा तातडीने निपटारा करुन नागरिकांना सहकार्य करावे. औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीनंतर सात ऑक्टोबर रोजी वैजापूर येथे उपविभागिय अधिकारी कार्यालयात आमदार रमेश बोरनारे, उपविभागिय अधिकारी माणिक आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत बॅक अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या असुन याबाबत 17 ऑक्टोबर रोजी पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. ग्रामीण भागात बॅकेच्या ठिकाणीही बैठक घेऊन तक्रारींचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र बॅक व महाराष्ट्र ग्रामीण बॅकेची शिऊर व वैजापूर येथे जवळपास साडे पाचशे प्रकरणे प्रलंबित असून यातील काही प्रकरणे ऑनलाईन करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे काही प्रकरणे अद्याप प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की,  आगामी जिल्हा परिषद निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूक लढविण्यासही आपण इच्छुक आहोत. सध्या राज्यात राजकीय घमासान सुरू असून काहीही होऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरला जाऊन सरसंघचालकांना भेट घेत आहेत. त्यामुळे शिंदे गट भाजपमध्ये विलिनीकरण होऊ शकतो. सध्या स्थानिक पातळीवर भाजपकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मोठी स्पर्धा असून यात भाजपच्या डाॅ. दिनेश परदेशी यांच्यासह एकनाथ जाधव इच्छुक आहेत. याशिवाय शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांचाही समावेश आहेच. परंतु यामध्येही मला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळून माझी लाॅटरी लागू शकते. असे सुतोवाच त्यांनी केले. यावेळी विष्णु भिंगारदेव, पंकज साळुंके, मंगेश भागवत, शिरीष चव्हाण, बाळासाहेब वरपे, दादासाहेब मुंढे आदी उपस्थित होते. दरम्यान जे. के. जाधव हे भाजपमधून सेनेत आले. सेनेत फूट पडल्यानंतर जाधव यांनी आमदार रमेश बोरनारे यांच्यासोबत राहणे पसंत केले. आता जाधव यांना विधानसभा निवडणुकीचे डोहाळे लागल्याने बोरनारे काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  

एका म्यानात दोन तलवारी कशा राहणार? 

भाजपमधून आपण सेनेत व नंतर शिंदे सेनेत का आलात? या प्रश्नाच्या उत्तरात जाधव यांनी एका ‘म्यानात’ दोन तलवारी कशा राहणार? असे सूचक विधान करून लहान बंधू तथा भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य एकनाथ जाधव यांच्यावर निशाणा साधून दोघांमध्ये बेबनाव असल्याचे दाखवून दिले. मला सर्वच बाबी स्पष्ट करता येणार नाही. असेही त्यांनी सांगितले.