सेंद्रिय शेतीचे लाभ व महत्व याविषयी निर्मला निकेतनतर्फे शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा

वैजापूर ,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- भारत कृषी प्रधान देश असून शेती हा या देशाचा परंपरागत व्यवसाय आहे. जुन्या काळातील सेंद्रिय शेतीची आजही गरज असून शेतकऱ्यांनी रासायनिक खते वापरून शेती करण्यापेक्षा सेंद्रिय खते वापरून शेती करावी असा सल्ला येथील जलरत्न पुरस्कार विजेते व स्वच्छतादूत म्हणून कार्यरत असलेले धोंडीरामसिंह राजपूत यांनी शेतकरी मेळाव्यात दिला. 

सेंद्रिय शेती प्रशीक्षणावर बोलताना दिला ते पुढे म्हणाले, रासायनिक खते वापरून शेतीचा” पोत” बिघडत आहे. शेती जगली तर माणसे जगतील व माणसे जगली तर देश जगेल‌. या साठी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याची नितांत गरज आहे असे ते म्हणाले. तालुक्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे लाभ व महत्व कळावे म्हणून सामाजिक संस्था “निर्मला इन्स्टिट्यूट”ने सोमवारी  हा कार्यक्रम आयोजित केला होता.

या मेळाव्यात तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी व शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संस्थेच्या प्रमुख नॅन्सी रोड्रीगज यांनी प्रास्ताविक केले. इरफान सय्यद यांनी सूत्र संचलन करून आभार मानले. राजपूत यांनी या मेळाव्यात शेतकऱ्यांना  विविध प्रश्न ही विचारले. शेतकऱ्यांनीही त्यांच्या शंका व समस्या विचारल्या. संभाषण, संवाद व चर्चा अशा उपक्रमाने मेळावा पार पडला.