ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा – माजी उद्योग संचालक जे.के.जाधव

वैजापूर ,२५ जून  /प्रतिनिधी :- जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपले उद्दिष्ट निश्चित करा व ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा असे आवाहन राज्याचे माजी उद्योग संचालक जे.के.जाधव यांनी केले. 

जे.के.जाधव महाविद्यालय, छत्रपती शाहु विद्यालय व राजमाता जिजाऊ इंग्लिश विद्यालयातर्फे दहावी व बारावी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा येथील पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवारी सत्कार करण्यात आला. दहावीतील 80 व बारावीतील 34 गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी मिसाळ, शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन वाणी, आमिर अली, गटशिक्षणाधिकारी हेमंत उशीर, तालुका आरोग्य अधिकारी गुरुनाथ इंदुरकर, कृषि अधिकारी एच.आर. बोयनर, डॉ.संतोष गंगवाल, माजी शिक्षणाधिकारी धोंडिराम सिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र, यशाची गुरुकिल्ली हे पुस्तक व रोपटे देऊन गौरवण्यात आला. विद्यार्थ्यांनी पाच रोपटी लावून वृक्षसंवर्धन करावे असे आवाहन करण्यात आले. नगराध्यक्षा शिल्पा परदेशी व उपनगराध्यक्ष साबेर खान यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पुजन करण्यात आले. प्राचार्य विष्णु भिंगारदेव यांनी प्रास्ताविक केले. पंकज साळुंके, मंगेश भागवत, उपप्राचार्य सुनिल कोतकर, एस.एन. सय्यद, एम.डी.पठारे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्राचार्य भुजाडे यांनी आभार मानले.