खंडाळा गावाजवळ डिझेल टँकर उलटला : जीवित हानी टळली

वैजापूर ,२५ जून  /प्रतिनिधी :- मनमाड येथून सिल्लोडकडे जाणारा डिझेलचा टॅकर उलटल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री औरंगाबाद रस्त्यावर खंडाळा येथे एका हॉटेलसमोर घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जिवित हानी झाली नाही. 

मनमाडहुन सिल्लोडकडे इंधन वहन करणारे  डिझेल टँकरच्या क्रमांक (एमएच 05 ए.एम. 17) चालकाचा ताबा सुटल्याने रोडच्या मध्यभागी उलटला. दरम्यान टँकरमधून इंधन गळती सुरू झाली. सदरची माहिती पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांना मिळाली. त्यानंतर बीट जमादार मोईस बेग, अंमलदार विठल जाधव, शकुल बनकर, रामेश्वर काळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी  रस्त्याच्या एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. वाहन उभे करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी अनेक क्रेन मालकांना संपर्क साधला. मात्र ‘रात्रीची वेळ व पोलिसांचा कॉल’  यामुळे पथकाला कुणीही प्रतिसाद दिला नाही. अखेर  जमादार मोईस बेग यांनी खंडाळा येथील एका खडी क्रेशर मालकाशी संपर्क करून त्यांना घटनेचे  गांभीर्य सांगितले व क्रेन पाठविण्यासाठी विनंती केली. क्रेशर मालकानेही क्षणाचाही विलंब न करता  घटनास्थळी क्रेन पाठवले. यानंतर पथकाने क्रेनच्या साह्याने वाहतूक सुरळीत केली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही असे पोलिसांनी सांगितले.