वैजापूर-गंगापूर मार्गावर महालगाव जवळ खासगी बस व कारची समोरासमोर धडक ; एक जण ठार

वैजापूर, ७ मे  /प्रतिनिधी :- वैजापूर- गंगापूर मार्गावर महालगाव जवळ इंडिका कार व ट्रॅव्हल्स बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (ता.6) रात्री 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

विलास दिनकर पुंड

याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर – गंगापूर मार्गावर महालगांव जवळील शेताजवळ (गट न.198) दौलतराव शेळके यांच्या वस्ती जवळ इंडिका विस्टा कार व सवेरा कंपनीची ट्रॅव्हल्स बस यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाल्याने कार चालक विलास दिनकर पुंड (रा.वाळूज) यांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. जखमीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर – वैजापूर रस्त्यावर रात्री 12 वाजेच्या सुमारास सवेरा कंपनीची ट्रॅव्हल्स बस (क्रमांक एम. एच. 20 ई. जी. 5577) ही वैजापूरच्या दिशेने जात असतांना समोरुन येणारी इंडिका विस्टा कार (क्रमांक एम. एच. 06 ए.डब्ल्यू. 5561) यांची समोरासमोर धडक झाल्याने इंडिका चालक विलास दिनकर पुंड (वय 42 रा. वाळूज) यांचा जागीच मृत्यू झाला तर अहेमद अली सय्यद हे जखमी झाले असून त्यांना स्वामी विवेकानंद रुग्णवाहिकेचा चालक सागर शेजवळ यांनी पुढील उपचारासाठी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास विरगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.गणेश पडूरे हे करीत आहेत.