महालगाव येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ पत्र्याचे शेड पडले ; प्रेक्षक किरकोळ जखमी

वैजापूर ,८ मे  / प्रतिनिधी :- सुप्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात राडा झाल्याचा प्रकार सोमवारी रात्री वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे घडला. पत्र्याच्या शेडवर उभे राहून कार्यक्रम बघत असतांना प्रेक्षकांच्या वजनाने हे शेड कोसळले आणि एकच धावपळ उडाली. या घटनेत काही प्रेक्षकांना किरकोळ मार लागल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचा हिरमोड झाला.

महालगाव येथे गौतमी पाटील या एका दुकानाच्या उद्घाटनासाठी आल्या होत्या. त्यानिमित्त त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमी पाटील यांची लोकप्रियता पाहता प्रेक्षकांनी या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे प्रेक्षकांनी मिळेल त्या ठिकाणी बसून व उभे राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे ठरवले.‌ कुणी स्टेजसमोरील जागेवर तर कुणी आजुबाजुच्या दुकानासमोर असलेल्या जागेत व अगदी पत्र्याच्या शेडवर बसून कार्यक्रमाचा आनंद लुटत होते. मात्र कार्यक्रम ऐन रंगात आला असताना एका दुकानावरील पत्र्याचे छत अचानक कोसळले आणि एकच धांदल उडाली. काही प्रेक्षकांनी पळ काढला. काही प्रेक्षकांना किरकोळ मार लागला. या घटनेमुळे चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागले.