गुटखा बाळगल्याप्रकरणी वैजापुरात एकाविरुध्द गुन्हा ; 58 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल पकडला

वैजापूर ,२५ जून  /प्रतिनिधी :- शासनाने बंदी घातलेले गुटखाजन्य पान मसाला पदार्थ बाळगल्याप्रकरणी परदेशी गल्ली येथील रामसिंग पुनमसिंग राजपूत (50) याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अन्न व सुरक्षा विभागाने शुक्रवारी पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांनी दोन जुनरोजी रामसिंग याच्या ताब्यातुन हस्तगत केलेल्या साठ्याची तपासणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी ज्योत्स्ना जाधव यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जून रोजी रामसिंग याला पोलिसांनी वैजापूर येवला रस्त्यावर नांदगाव बस ठेप्याजवळ दुचाकीवरुन शासनाने बंदी घातलेल्या विविध पान मसाला पदार्थांची वाहतुक करतांना पकडले होते. त्यांच्याकडे हिरा पान मसाल्याचे 1300 रुपये किमतीचे दहा पाकिट, विमल पान मसाल्याचे1980 रुपये किमतीची दहा पाकिटे, आरएमडी पान मसाल्याचे ९६० रुपये किमतीचे दोन खोके, 720 रुपये किमतीचे दोन तंबाखुचे खोके, गोवा गुटख्याचे तीन हजार 750 रुपये किमतीची 15 पाकिटे व 50 हजार रुपये किमतीची दुचाकी असा सुमारे 58 हजार 710 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळुन आला होता. या सर्व मालाची अन्न व औषधी प्रशासनाने तपासणी केल्यानंतर रामसिंग राजपूत याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.