भाजपचे एकनाथराव जाधव यांना आमदारकीचे डोहाळे

‘अभी नहीं तो कभी नहीं’ म्हणत विधानसभेसाठी मोर्चेबांधणी

जफर ए.खान 

वैजापूर,२७ जून:-आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.भारतीय जनता पार्टीतर्फे तालुक्यात बैठकांचा धडाका सुरू असून  निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याबरोबर जाण्याच्या कारणावरून भाजपमध्ये दोन गट पडले. बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव व त्यांच्या समर्थकांनी महाविकास आघाडीसोबत युती केली तर माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी हे शिंदे गटाबरोबर गेले.या निवडणुकीत शिंदे- भाजप गटाला बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीच्या पॅनलला पराभवाला सामोरे जावे लागले. तेंव्हापासून  भाजपमध्ये जाधव व परदेशी असे दोन गट पडले  असून या दोन्ही गटात सध्या शीतयुद्ध सुरू आहे. ‘अभी नही तो कभी नहीं’ म्हणत एकनाथराव जाधव यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

भाजपचे एकनाथराव जाधव यांनी आपल्या पक्षाच्या तिकिटावर 2014 ची तर डॉ.दिनेश परदेशी यांनी काँग्रेस पक्षातर्फे 2004 व 2009 ची विधानसभा निवडणूक लढवलेली असून या निवडणुकीत दोघांना पराभवाचा सामना करावा लागला होता. जाधव व परदेशी हे दोघेही सध्या भाजपमध्ये असून त्यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू असल्याचे चित्र आहे. दोघांनाही आमदार होण्याची इच्छा असून त्यादृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

डॉ.दिनेश परदेशी

बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना- भाजप युतीच्या पॅनलला बहुमत मिळाल्यानंतर भाजप पक्षश्रेष्टींनी डॉ.दिनेश परदेशी यांची वैजापूर विधानसभा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करून त्यांच्यावर वैजापूर विधानसभेची जबाबदारी सोपवली. डॉ.परदेशी यांच्या नियुक्ती करून एकनाथराव जाधव व त्यांच्या समर्थकांना पक्ष श्रेष्टींनी धक्का दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दरम्यान एकनाथराव जाधव यांनी ‘अभी नहीं तो कभी नहीं’ असे म्हणत विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिऊर सर्कल व वैजापूर शहरामध्ये जाधव यांनी दोन गुप्त बैठका घेतल्या असून विधानसभेची निवडणूक लढवण्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे.