वैजापूर शहर व ग्रामीण भागात पावसाची हजेरी शेतकरी सुखावला ; पेरण्यांना वेग येणार

वैजापूर ,२७ जून/ प्रतिनिधी :-लांबणीवर पडलेल्या पावसाने अखेर मंगळवारी (२७) वैजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात सर्वदुर हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामात अंकुरलेल्या पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे. जवळपास दोन तास कमी अधिक तीव्रतेने पावसाची रिपरिप सुरु होती. त्यामुळे पावसाच्या प्रतिक्षेत असलेला शेतकरी सुखावला आहे.‌

मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली.‌ त्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पाऊस पडला.‌ पुर्व भागातील गारज, झोलेगाव, जरुळ, खंडाळा, चिकटगाव, शिऊर परिसरात पाऊस पडला. याशिवाय महालगाव, वाघला, चिंचडगाव, कनकसागज या गावांसह गंगथडी‌ भागातील‌ बहुतांश गावात पाऊस पडल्याचे वृत्त आहे.‌ या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. मृग नक्षत्रात पाऊस पडेल या आशेवर बहुतेक शेतकऱ्यांनी कपाशी व मका या पिकांची लागवड केली होती. मात्र पेरणीनंतर दहा दिवस उलटुनही पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. तथापि पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी विहिरींचे पाणी देऊन ही पिके वाचवण्याचा प्रयत्न केला.‌ त्यामुळे या पावसाने अंकुरलेल्या पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता असुन तग धरुन राहिलेल्या पिकांना उभारी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. रात्री उशीरापर्यंत आकाश ढगाळलेले होते.