आई -वडिलांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला ; काही महिन्यांतच सासरच्या मंडळींकडून छळ पतीसह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल

वैजापूर,१९ जुलै /प्रतिनिधी :- आई -वडिलांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला पण लग्नाच्या काही महिन्यांतच सासरच्या मंडळींनी तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. ट्रॅक्टर आणण्यासाठी माहेरहून ५० हजार घेऊन ये अशी मागणी करत तिला शिवीगाळ व मारहाण करुन जिवंत मारण्याची धमकी दिली. म्हणून प्रिती धलांगे (रा. जळगाव) या विवाहितेने पोलिसांत तक्रार दिली. त्यावरुन पतीसह चार जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रामेश्वर विजय धलांगे (पती), विजय एतनाथ धलांगे (सासरा), अलकाबाई विजय धलांगे (सासु) व संभाजी विजय धलांगे (दिर) अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील शहाजतपूर येथील प्रिती यांनी आईवडील व नातेवाईकांच्या विरोधाला न जुमानता रामेश्वर धलांगे याच्याशी छत्रपती संभाजीनगर येथे एका मंदिरात २४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रेमविवाह केला होता. मात्र तीन महिन्यानंतरच पती रामेश्वर याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. तसेच ट्रॅक्टर आणण्यासाठी माहेरहुन ५० हजार रुपये घेऊन ये असे म्हणत रामेश्वर दारु पिऊन तिला मारहाण करायला लागला. सासु सासरे व दिर यांनीही तिला सतत मारहाण करुन जिवंत मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून महिला तक्रार निवारण केंद्रातही तक्रार दिली. मात्र काही उपयोग झाला नाही. अखेर, प्रिती यांनी आपल्या वडिलांसोबत पोलिस ठाण्यात जाऊन चौघांविरुद्ध तक्रार दिली. यावरुन वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास किरण गोरे हे करीत आहेत.