वैजापूरमध्ये भाजपची टिफीन बैठक

वैजापूर,१९ जुलै /प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून नऊ वर्षांत समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी कार्य करण्यात आले. त्या अनुषंगाने भाजपतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘मोदी @९’ कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने सोमवारी (ता. १७) शहरात भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेली टिफिन बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.

या बैठकीस वैजापूर विधानसभा प्रमुख डॉ.दिनेश परदेशी, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथ जाधव, तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, शहराध्यक्ष दिनेश राजपूत, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप, माजी नगरसेवक दशरथ बनकर, प्रशांत कंगले, कैलास पवार, गणेश खैरे, प्रेम राजपूत, सुरेश राऊत, नारायण कवडे, शैलेश पोंदे, सोनु राजपुत, सागर राजपुत, जितु पवार, प्रकाश गायके,महेंद्र  काटकर, किरण व्यवहारे, प्रदीप चव्हाण, महेश भालेराव, प्रताप महेर, संतोष मिसाळ, रमेश जेजुरकर, दिनेश थोरात यांच्यासह पदधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ.परदेशी यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाने विधानसभा मतदारसंघानिहाय स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ‘टिफिन बैठक’ चे आयोजन केले होते. या बैठकीच्या संकल्पनेनुसार आपआपल्या घरून जेवणाचा डबा आणून सामूहिक भोजन करण्यात आले तसेच चर्चात्मक संवाद साधण्यात आले. ‘मोदी @९’ कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने, मोदी सरकारच्या काळात झालेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी ‘विकास तिर्थ’, डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनिअर यांचे ‘प्रबुद्ध नागरी संमेलन’, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोदी सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा देणाऱ्यांचे ‘सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर संमेलन’, विशाल रॅली, जाहीर सभा, योग दिन, ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन, लाभार्थी संमेलन, व्यापारी संमेलन, व्हर्च्युअल रॅली, घरोघरी संपर्क अभियान, संयुक्त मोर्चा संमेलन अशी विविध कार्यक्रम शहरासह ग्रामीण भागात राबविले जात असल्याचे परदेशी यांनी सांगितले.