गोदावरी पात्रातून अवैधरित्या वाळू चोरी प्रकरणी आरोपीस दोन वर्षांची शिक्षा

वैजापूर न्यायालयाचा निकाल ; आरोपी लाखगंगा येथील रहिवासी

वैजापूर,२९ डिसेंबर / प्रतिनिधी :-गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळूची अवैधरित्या चोरी करणाऱ्या एकास येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी.एम.पवार यांनी दोन वर्षांच्या साध्या कैदेसह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आणखी एक महिना साध्या कैदेची शिक्षा भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. भाऊसाहेब निवृत्ती तुरकणे (४३, रा. लाखगंगा) असे शिक्षा ठोठविण्यात आलेल्या आरोपीचे  नाव आहे.

२० जून २०१८ रोजी तालुक्यातील वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही चोरीची घटना उघडकिस आली होती. वीरगाव पोलिस ठाण्याचे बाबासाहेब धनुरे हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत  हद्दीतील अवैधधंद्याची माहिती काढण्यासाठी गस्तीवर असताना त्यांना तालुक्यातील लाखगंगा येथून वाळुने भरलेला ट्रॅक्टर पुरणगावकडे येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन लाखगंगा गावाजवळच्या चौकात आले. यावेळी ट्रॅक्टरला हात दाखवून थांबवले असता ट्रॅक्टर चालकाने रस्त्याच्या बाजूला वाहन थांबवत तेथून पळ काढला. पोलिसांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. पोलिसांनी पंचासमक्ष जप्तीची कारवाई केली. तसेच ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात आणून चालकाविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणात पाच जणांची साक्ष नोंदवण्यात आली. दोन्ही बाजुचे साक्षी पुरावे तपासल्यानंतर या प्रकरणात भाऊसाहेब  तुरकणे हा चोरीच्या आरोपासह अन्य आरोपाखाली दोषी असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी.एम.पवार यांनी आरोपीस दोन वर्षे साधा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच मोटारवाहन कायद्यांतर्गत शंभर रुपये दंड व दंड न भरल्यास चार दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.