लाडगाव शिवारात वाहनातून जनावरांची तस्करी :तिघांविरुध्द विरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वैजापूर,२९ डिसेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर शहरासह जनावरांची तस्करी सुरूच असून वीरगाव पोलिसांनी पुन्हा एकदा या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. वाहनातून कत्तलीसाठी घेऊन जाणारी गायी व वासरे असा वाहनासह एकूण 5 लाख 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 28 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील लाडगाव शिवारात पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरुख अन्वर शहा, अजीम मूनवर शहा (दोघे रा.ममदापूर ता. राहता ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे असून एकाचे नाव मात्र पोलिसांना समजू शकले नाही.

28 डिसेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील लाडगाव शिवारात चोर आले असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचे पथक लाडगाव शिवारात दाखल झाले. तेथे पोहचल्यानंतर वैजापूर-श्रीरामपूर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाची पथकाने तपासणी सुरू केली असता  पिकअपला ( क्रमांक 03 एएच 2408) पोलिसांनी अडविल्याने चालकाने वाहन थांबवून गाडीतून उडी मारून तेथून पळ काढला. 

वाहनातील बाजूच्या आसनावर बसलेल्या एकाची पोलिसांनी चौकशी सुरू केली असता त्याने त्याचे नाव अजीम  शेख व पळून गेलेल्या चालकाचे नाव शाहरुख शहा असल्याचे सांगितले. पोलिसांनी वाहनाची  तपासणी केली असता त्यामध्ये कत्तलीसाठी 2 गायी व 2 वासरे नेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. 2 लाखांचे वाहन व 60 हजार रुपये किंमतीची जनावरे असा एकूण 2 लाख 60 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी कारवाईदरम्यान हस्तगत केला. याशिवाय दुसराही संशयित पिकअप (क्रमांक एम एच 17 बी वाय 6231)  पोलिसांच्या जवळून गेल्याने सहकारी कर्मचाऱ्यांनी याबाबत शरदचंद्र रोडगे यांना सांगितले. त्यामुळे रोडगे यांनी वाहनाचा पाठलाग करून तो पिकअप अखेर तालुक्यातील महालगाव शिवारात पकडला. परंतु चालकाने हे वाहन रस्त्याच्या खाली उतरवून येथून  धूम ठोकली. पोलिसांनी 2 लाख रुपये किंमतीचे वाहन व त्यातून 75 हजार रुपये किंमतीच्या गायी असा एकूण 2 लाख 75 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी तिघांविरुध्द वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुन्हा एकदा वैजापूरचे राहता कनेक्शन

दरम्यान 20 डिसेंबर रोजी तालुक्यातील लाडगाव शिवारातच कत्तलखान्यात जनावरे घेऊन जाणारी दोन वाहने वीरगाव पोलिसांनी पकडली होती. यात पोलिसांना 21 जनावरे आढळून आली होती तर 21 जनावरे कत्तलखान्यात पोहचली गेली होती. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. जनावरांची तस्करी करणारे हे राहता तालुक्यातील ममदापूर येथीलच होते. आजच्या कारवाईतही जनावरांना कत्तलखान्यात घेऊन जाणारे हे याच गावातील रहिवासी आहेत. त्यामुळे वैजापूरचे राहता कनेक्शन पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.