सत्तेतून विरोधात जाण्याची लढाई मोठ्या धाडसाने लढलो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महालगाव येथील साखर कारखान्याच्या भूमीपूजन प्रसंगी शिंदे यांचे प्रतिपादन

वैजापूर,३० जुलै /प्रतिनिधी :- आम्ही सत्तेतून विरोधात जाण्याची लढाई मोठ्या धाडसाने लढलो. ही लढाई सोपी नव्हती. पण एकदा निर्णय घेतल्यानंतर तो तडीस नेण्याच्या दृष्टीने पावले उचलली. त्यामुळेच आज तुमच्या सेवेसाठी मी मुख्यमंत्री म्हणून उभा आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

वैजापूर तालुक्यातील महालगाव शिवारात पंचगंगा उद्योग समूहातर्फे उभारण्यात येणाऱ्या श्री.स्वामी समर्थ साखर कारखान्याचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले.त्याप्रसंगी ते बोलत होते.2019 च्या विधानसभा निवडणुकीत स्व. बाळासाहेब ठाकरे व नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मिळवली. मात्र त्यानंतर बाळासाहेबांनी ज्यांचा शत्रु म्हणून उल्लेख केला होता त्या राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेसशी हातमिळवणी करुन सत्ता काबीज केली‌. ही सल अनेक आमदारांच्या मनात होती. त्याचा उद्रेक होऊन उठाव झाला.‌ या अडीच वर्षाच्या काळात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व शिवसैनिकांना काय मिळाले ? असा सवाल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला. 

कार्यक्रमाला आमदार रमेश पाटील बोरनारे, सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज, महामंडलेश्वर शांतिगीरी महाराज, माजी मंत्री संदिपान भुमरे, दादा भुसे, उदय सामंत, बालाजी कल्याणकर, माजी आमदार सुभाष झांबड, गंगापूरचे आमदार प्रशांत बंब, नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब जगताप, पंचगंगा उद्योग समुहाचे प्रभाकर शिंदे, उत्तमराव शिंदे, बाबासाहेब शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

शिंदे म्हणाले, आम्ही सत्तेतुन विरोधात जाण्याची लढाई मोठ्या धाडसाने लढलो.ही लढाई सोपी नव्हती. पण एकदा निर्णय घेतल्यानंतर तो तडीस नेण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली.‌ त्यामुळेच आज तूमच्या सेवेसाठी मी मुख्यमंत्री म्हणुन उभा आहे. हे सरकार शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे. त्यामुळे राज्याचा विकास ही आमची भुमीका आहे. विकास करण्यासाठी पाहिजे तेवढा निधी देऊ असे त्यांनी सांगितले.‌ ््

तालुक्यातील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत असलेल्या पंधरा गावातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत व रोटेगाव येथील औद्योगिक वसाहतीसाठी संपादित जमीनीच्या मुळ मालकांना मोबदला देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. नवीन उभारण्यात येणाऱ्या या साखर कारखान्यामुळे तालुक्याच्या विकासास हातभार लागणार असून कारखान्याने इथॅनॉल निर्मितीवर भर द्यावा व उद्योग वाढवावा तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार सुभाष झांबड यांनीही मनोगत व्यक्त केले.

तुम्ही मला निवांत भेटा…

विधानपरिषदेचे आमदार सुभाष झांबड यांनी 2011 मध्ये या साखर कारखान्यासाठी परवाना मिळवला व जमीन खरेदी केली होती. मात्र आमदार झाल्यानंतर हा प्रस्ताव मागे पडला. आता हा कारखाना एक वर्षात सुरु करण्याची तयारी पंचगंगा उद्योग समुहाने दाखवल्याने झांबड यांनी जमीन दिली. त्यामुळे हा कारखाना सुरु होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. परिणामी वैजापूर व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झांबड यांच्याकडे कटाक्ष टाकत ‘ तुम्ही मला निवांत भेटा’ असे सांगितले. त्यामुळे व्यासपीठावर एकच हशा पिकला.