वैजापूर सोसायटीची निवडणूक बिनविरोध : ठाकरे गटाची सरशी ; शिंदे गटाला 5 जागा

वैजापूर, २ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी बिनविरोध पार पडली. सोसायटीच्या या निवडणुकीत शिंदे व ठाकरे गटाच्या पॅनेलमध्ये चुरशीची लढत होईल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, माजी आमदार स्व.आर.एम.वाणी यांनी या संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पाडण्याची परंपरा कायम ठेवण्यात सर्वपक्षीय नेतृत्वाने महत्वाची भुमिका बजावली. यात ठाकरे गटाची सरशी झाली.13 पैकी 8 जागा ठाकरे गटाला तर 5 जागा शिंदे गटाला मिळाल्या.

13 नोव्हेंबर रोजी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी ठाकरे आणि शिंदे गटातर्फे मोर्चेबांधणी सुरू होती. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा माजी आमदार स्व. आर.एम.वाणी यांचे चिरंजीव सचिन वाणी यांनी स्व. आर.एम. वाणी विकास मंच या नावाने पॅनल तयार केले होते. तर आ. रमेश बोरणारे यांचे समर्थक तथा शिंदे गटाचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके यांनीही त्यांचे पॅनल निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. संचालक पदाच्या 13 जागांसाठी 40 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्व.आर.एम.वाणी यांनी घालून दिलेली सोसायटीच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवण्यासाठी माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी हालचाल सुरू केली व आ.रमेश बोरणारे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. या तिघांच्या मध्यस्थीनंतर निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार 40 पैकी 27 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले व संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाली.

सर्व साधारण मतदारसंघातून 1) कैलास साहेबराव सांळुके, 2) मधुकर दतात्रय साळुंके, 3) जगन्नाथ भावराव इंगळे, 4) हिरामण रंगनाथ शेळके, 5) अरविंद रंगनाथ साळुंके, 6) संतोष नानासाहेब मापारी, 7) रतिलाल गंगाधर गायकवाड, 8) भिका सावळेराम नाईकवाडी महिला राखीव मतदारसंघ 9) अनिता देवीदास वाणी, 10) शोभा कैलास नांगरे, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून 11) प्रशांत उत्तमराव त्रिभुवन, इतर मागास प्रवर्ग गटात 12) शांतीलाल नामदेव पवार, भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग गोरख उत्तमराव गावडे यांची बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली.

निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यासाठी आ.रमेश बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, तालुकाप्रमुख ( शिंदे सेना ) राजेंद्र साळुंके, घन:श्याम वाणी, श्रीकांत साळुंके, अशोक निखाडे, माजी नगरसेवक लिमेश वाणी, बाजार समितीचे संचालक दिगंबर खंडागळे, दिपक सांळुके, रामकिसन जोरे, माजी नगरसेवक वसंत त्रिभुवन, शंकर मुळे आदीने पुढाकार घेतला. 

वाणी कुटुंबाच्या सूनबाईचे राजकारणात पदार्पण

दिवंगत आमदार आर.एम.वाणी यांच्या सूनबाई अनिता देवीदास वाणी यांची वैजापूर विकास सोसायटीत महिला राखीव प्रवर्गातून संचालक म्हणून वर्णी लागली.सहकार क्षेत्रातील निवडणुकीचे माध्यमातून प्रथमच वाणी कुटुंबाच्या  सूनबाई राजकीय वर्तुळात सक्रिय झाल्या आहेत.