जळगाव महापौर निवडणूक ऑनलाइनच,औरंगाबाद खंडपीठाने याचिका फेटाळली

औरंगाबाद, दिनांक 17 :जळगाव महानगरपालिकेची महापौर व उपमहापौर पदांसाठी प्रत्यक्ष सभागृहात प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवड करण्याची मागणी करणाऱ्या भाजप नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. ऑनलाईन पद्धतीचे नियमांचे काटेकोरपणे पालन करून निवड प्रक्रियेस न्या. संजय गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी हिरवा कंदील दाखविला आहे.
जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी ऑनलाईन ऐवजी सभागृहात प्रत्यक्ष मतदान घ्यावे यासाठी बुधवारी (१७ मार्च) सुनावणी झाली.राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका प्रत्यक्षा सभागृहात उपस्थित राहून घेतल्या मग जळगाव महापालिका अपवाद कशासाठी असा प्रश्नही भाजपच्या याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला होता.विश्वासार्ह आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक व्हावी यासाठी प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून मतदान घ्यावे असी विनंती खंडपीठाकडे केली होती. यासाठी भाजप नगरसेवक रंजना विजय सोनार आणि विश्वनाथ सुरेश खडके यांनी औरंगाबाद खंडपीठात
विभागीय आ?ुक्त व मनपा आयुक्तांच्या ५ मार्च २०२१ रोजीच्या  ऑनलाईन निवडणुकीच्या घोषणेला आव्हान दिले होते. महापौर व उपमहापौरांची निवडणूक गुरूवारी (१८ मार्च) ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे संबंधित पत्रात म्हटले आहे.महापौर व
उपमहापौर निवडणूक प्रत्यक्ष सभागृहात घेण्याचे आदेश असून नुकतीच पिंप्री चिंचवड आणि नागपूर मनपाच्या निवडणुका सभागृहात झाल्याचा युक्तीवाद करण्यात आला होता.
याचिकेत प्रशांत नाईक यांच्यावतीने प्रशांत कातनेश्वरकर यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. राज्यात कोविडमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून, शासनाचा निर्णय लोकहिताच्या दृष्टीने योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाच्या वतीने खंडपीठात बाजू मांडताना कुठल्याच नियमांची पायमल्ली होणार नसून, जळगाव मनपात ७५ नगरसेवक असून पन्नासपेक्षा जास्त
जणांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे स्पष्ट केले.
याचिकाकर्त्यांच्या वतीने अमरजितसिंह गिरासे, योगेश बोलकर, ज्ञानेश्वर बागुल व विष्णू मदन पाटील यांनी बाजू मांडली. मनपातर्फे शैलेश ब्रह्मे तर शासनाच्या वतीने सरकारी वकील डी. आर. काळे यांनी काम पाहिले.