वैजापूर तालुक्यातील टेंभी – नादी शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ ; बेदम मारहाण करून रोख रक्कम व दागिने चोरी

वैजापूर ,१४ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत  एकाच रात्रीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घालत बेदम मारहाण करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे ५० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.आश्चर्य म्हणजे दोन्ही घटनेत चोरट्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी चक्क कत्तीने वार केल्याने जखमींना उपजिल्हा रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे.

कडु गंगाराम बर्डे (रा.टेंभी)  शिवारात शेतीव्यवसाय व वॉचमनची नोकरी करून उपजीविका भागवितात.शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी बर्डे यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीस कत्तीने मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र व 20 हजारांची रोख रक्कम जबरीने घेऊन पसार झाले.दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास नादी येथे राहणारे बेबीताई अशोक त्रिभुवन यांच्या घरात घुसुन त्यांच्या हातावर कत्तीने वार करत त्यांना जखमी केले.त्यांचा आवाज ऐकून मदतीसाठी त्यांचे पती धावून आले असता चोरट्यांनी त्यांच्यावरही कत्तीने हाता, पायावर, डोक्यात मारून गंभीर जखमी करून बेबीताई यांच्या गळ्यातील १३ हजार ५०० रूपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले.या दोन्ही चोरीच्या घटनेबाबत कडु गंगाराम बर्डे व बेबीताई अशोक त्रिभुवन  यांनी वीरगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 49 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास एपीआय शरदचंद्र रोडगे करीत आहे.

गुन्हे शाखेचे पथक ऍक्शन मोडमध्ये

शनिवारी रात्री चोरट्यांनी दोन ठिकाणी धुमाकूळ घालत पुरुषांना व महिलांनाही कत्तीने जबर मारहाण करून रोख रक्कम व महिलाच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवून नेल्याची घटना घडली. विशेष म्हणजे चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसले तरी नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार बाळू पाथ्रीकर, पोलीस हवालदार संजय घुगे, नरेंद्र खंदारे, दिपक सुरासे, ज्ञानेश्वर मेटे, संजय तांदळे यांच्या पथकाने रविवारी घटनास्थळी पंचनामा करून चोरट्यांचे विविध ठिकाणी लोकेशन व  खबऱ्या मार्फत माहिती गोळा करताना दिसले.