वैजापुरात जिल्हा परिषदच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या शिक्षिकांच्या समस्या

विभागीय आयुक्तांनी दिले होते निर्देश ; सहकारी गुरूजींच्या होत्या गंभीर तक्रारी

वैजापूर,२९ डिसेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील सहकारी गुरूजींकडून शिक्षिकांना अपमानस्पद वागणूक व हेतुपुरस्सर नाहक त्रास होत असलेल्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे दस्तूरखुद्द विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलीच तंबी दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिका-यांनी वैजापूर येथे येऊन तालुक्यातील सर्वच शाळांतील शिक्षिकांना बोलावून तक्रारी जाणून घेतल्या. 

तालुक्यातील जरूळ येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सोमीलाल जगदाळे व लाडगाव येथील शिक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्यासह अन्य काही शाळांतील गुरूजींच्या सहकारी शिक्षिकांनी गंभीर तक्रारी शिक्षण विभागाकडे केल्या होत्या. याबाबत वर्तमानपत्रांमध्ये बातम्याही प्रसिद्ध झाल्या. परिणामी शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर येऊन या विभागाची प्रतिमा मलिन व्हायला लागली. याशिवाय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे गुरूजींच्या थेट तक्रारी गेल्या. या घटनेच्या पार्श्वभूमीवर दस्तूरखुद्द विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक संगीतादेवी पाटील, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण ( प्राथमिक ) यांना शिक्षिकांनी विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शहरानजीकच्या रोटेगाव येथील मराठवाडा इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी ( एमआयटी ) या संस्थेच्या सभागृहात तालुक्यातील शिक्षिकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याबाबत अत्यंत गोपनीयता बाळगून कार्यशाळेत शिक्षण विभागाच्या पुरूष अधिकारी व शिक्षकांना प्रवेश दिला गेला नाही. कार्यशाळा झाल्यानंतर शिक्षिकांच्या अधिकाऱ्यांनी तक्रारी ऐकून घेतल्या. याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

याशिवाय तालुक्यातील पानवीखंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्षभरापूर्वी बांधकाम झालेल्या खोलीच्या छताच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळून दोन विद्यार्थी जखमी झाले होते.जरूळ शाळेचे मुख्याध्यापक सोमीलाल जगदाळे यांच्यावर चार महिला शिक्षकांनी शाळेत पदाचा गैरवापर करून गंभीर तक्रारी केल्या होत्या. त्यांनी तब्बल १७ मुद्दे   तक्रारीत मांडले होते. तसेच शाळेत आरामसाठी ‘बेड’ तसेच विद्यार्थ्यांना ‘गुटखा’ आणण्यासाठी दुकानात पाठवणे यासह अन्य गंभीर प्रकार गटशिक्षणाधिका-यांच्या निदर्शनास आले होते. तसे जवाबही त्यांनी विद्यार्थ्यांकडून नोंदवून घेतले होते.परंतु त्यानंतर  शिक्षिकांनी तक्रार मागे  घेतली होती. ही तक्रार कोणाच्या दबावखाली मागे घेतली. याचा उलगडा अद्याप झाला नाही. यासंदर्भात गटशिक्षणाधिका-यांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.  जगदाळेंची बदली झाल्यामुळे तूर्तास हा विषय थंडावला असला तरी अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणासह  पानवीखंडाळा येथील शाळा खोलीच्या प्रकरणात संबितांविरुध्द कारवाई ही अटळ असल्याचे शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी यावेळी सांगितले. दरम्यान शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराची दस्तूरखुद्द विभागीय आयुक्तांनी दखल घेत मुजोर गुरूजींच्या प्रतापाची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील सहकारी गुरूजींकडून शिक्षिकांना अपमानस्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी विभागीय आयुक्तांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे याबाबत शिक्षिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात काहींनी आपबीती सूचक शब्दांत मांडली तर काही शिक्षिका तक्रारी करण्यास धजावल्या नाहीत असे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी  संगीतादेवी पाटील यांनी सांगितले.