नागमठाण – चेंडूफळ रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार

वैजापूर ,१२ एप्रिल  / प्रतिनिधी :- सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येत असलेल्या वैजापूर तालुक्यातील नागमठाण ते चेंडुफळ रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. या कामाची चौकशी करावी असे निवेदन त्यांनी बांधकाम विभागाला दिले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक वर्षानंतर या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. नागमठाण ते चेंडुफळ या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे यापुर्वी महिलांची प्रसुती रस्त्यातच झाल्याच्या अनेक घटना घडल्या असुन काही महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम हाती घेतल्याने हा रस्ता दर्जेदार होऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही अशी अपेक्षा असतांना बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांनी हातमिळवणी करत निकृष्ट पद्धतीने काम सुरु केले आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या कामाची पाहणी करुन चौकशी करावी अशी मागणी नागमठाण येथील गणेश तांबे, प्रवीण चव्हाण, गणेश ठोंबरे, मोहन दिवटे, मनोज वीरकर, पवन चव्हाण, राजु खुरुद, माऊली काळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.