विवाहितेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

 वैजापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

वैजापूर ,३१ जानेवारी / प्रतिनिधी :- क्रूझर जीप घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी आरोपी पतीस वैजापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एम.आहेर यांनी आज जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

साहेबराव मुकींदा शिंदे (65 वर्ष) रा.वाडीरामसगांव ता.धनसावंगी जिल्हा जालना यांची मुलगी शालू हिचा विवाह भागाठाण ता.गंगापूर येथील योगीराज भास्कर सुर्वे याच्याशी 3 जानेवारी 2016 रोजी रितिरिवाजाप्रमाणे झाला.लग्नानंतर सासरच्या लोकांनी क्रूझर जीप घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत म्हणून शालू हिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. मागणी पूर्ण न झाल्याने 2 जून 2017 रोजी शालू हिला मारहाण करून व गळा दाबून तिचा खून करण्यात आला. या प्रकरणी शालू हिचे वडील साहेबराव मुकींदा शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिल्लेगांव पोलीस ठाण्यात पती योगीराज भास्कर सुर्वे, सासरा भास्कर सोना सुर्वे, सासू लिलाबाई सुर्वे व दीर विनोद सुर्वे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.डी. कोकणे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. 

सदर प्रकरणात एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. साहेबराव शिंदे, पंडीत वराडे, प्रमोद आल्हाट व तपासणी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.डी.कोकणे यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या.  वैजापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश – 2 डी.एम.आहेर यांच्यासमोर आज या प्रकरणाची सुनावणी होऊन आरोप सिद्ध झाल्याने मयत शालू हिचा पती योगीराज सुर्वे यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली तर सासरा भास्कर सुर्वे, सासू लिलाबाई सुर्वे व व दीर विनोद सुर्वे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सागर विघे यांनी त्यांना सहकार्य केले.