वैजापूर बाजार समितीची निवडणूक चुरशीची ठरणार ; आजी- माजी आमदाराचे पॅनल समोरासमोर उभे ठाकणार

जफर ए. खान 

वैजापूर ,१२ एप्रिल  / :- वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून पक्ष नेत्यांकडून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे.राज्यात झालेल्या सत्ता बदलामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणेही बदलली असून आजी – माजी आमदाराचे पॅनल समोरासमोर उभे ठाकणार असल्याने बाजार समितीच्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

स्थानिक पातळीवर ओढाताण न करता जुळवून घेण्याची भूमिका शिंदे गटाचे आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान व भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी यांनी घेतली असून बाजार समितीची निवडणूक युतीच्या माध्यमातून लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. असे असले  तरी भाजपमधील एक मोठा गट मात्र या विरोधात असून हा गट महाविकास आघाडीशी युती करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर भाजपच्या या गटाशी युती करण्यावरून महाविकास आघाडीतील पक्षात थोड्याफार कुरबुरी व ताणतणाव असल्याचे चित्र आहे. 

वैजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होत असल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यानिमित्ताने भारतीय जनता पक्षातील गटबाजी उघडकीस आली असून भाजपाच्या एका गटाने  शिवसेना शिंदे गटाशी युती केली आहे. या दोघांत समसमान जागा वाटपाचे सुत्र असल्याची माहिती आहे. तर भाजपाच्या दुसऱ्या गटाने कॉग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे अर्थात महाविकास आघाडीबरोबर युती केली आहे. भाजपातील काही जणांनी मनसे, प्रहार या संघटनेसोबत जाऊन तिसरा पर्याय दिल्याची माहिती आहे.

वैजापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रात झालेल्या २४२ उमेदवारी अर्जांमधून दहा जणांचे अर्ज अवैध ठरल्याने आता २३२ अर्ज शिल्लक असून यातील काही जण २० एप्रिल रोजी निवडणुक रिंगणातून माघार घेतील. त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.‌ या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व शिवसेना (शिंदे गट) भाजप युती यांच्यात सरळ सरळ लढत होईल असे चित्र होते. मात्र उमेदवारीवरुन भाजपात धुसफुस सुरु झाल्याने भाजपातील तालुका पातळीवरील नेते व कार्यकर्त्यांनी स्वत़ंत्रपणे चुल मांडुन निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय चित्र पुर्णपणे बदलले आहे.

वैजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीवर मागील अनेक वर्षांपासुन शिवसेनेचे वर्चस्व असून शिवसेनेचे माजी आमदार स्व. आर.एम. वाणी यांनी बाजार समितीत अनेक विकास कामे करुन ही बाजार समिती नावारुपास आणली.‌ या समितीत शिवसेनेचे अठरा पैकी दहा संचालक निवडून आले होते‌. मात्र राज्यस्तरावर शिवसेना पक्ष फुटल्यानंतर त्याचे परिणाम तालुकास्तरावर ही जाणवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपातील एका गटाने शिंदे गटाशी तर दुसऱ्या गटाने महाविकास आघाडीशी निवडणुकीत युती करुन आपले उमेदवार उभे करण्यावर भर दिला आहे‌. त्यामुळे ही निवडणुक अधिक रंगतदार होणार आहे‌.

निवडणुकीतील प्रमुख उमेदवार

एकनाथ जाधव, जे.के.जाधव, संजय पाटील निकम,  ॲड.‌आर.डी. थोट, ज्ञानेश्वर जगताप, एकनाथ त्रिभुवन, मीना गलांडे, रिखबचंद पाटणी, विजय ठोंबरे, मनाजी मिसाळ, प्रशांत सदाफळ, रियाज अकिल शेख, डॉ. राजीव डोंगरे, पुनमसिंग डोंगरजाळ, अनिता वाणी, कचरु डिके, उत्तम निकम