समृध्दी महामार्गाच्या कामासाठी दहेगांव शिवारात गौण खनिजाचे नियमबाह्य उत्खनन

एल अँड टी कंपनीचे पोकलेन मशीन व तीन हायवा वाहने जप्त ; महसूल प्रशासनाची धडक कारवाई

जफर ए.खान

वैजापूर,४ डिसेंबर :- तालुक्यातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गाच्या कामासाठी दहेगांव शिवारातील गायरान  जमिनीवर गौण खनिजाचे अवैध व नियमबाह्य उत्खनन करणाऱ्या एल अँड टी कंपनीचे पोकलेन मशीन व तीन हायवा वाहने जप्त करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्या आदेशानुसार शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

Displaying IMG-20211204-WA0090.jpg


वैजापूर तालुक्यात गेल्या दोन-अडीच वर्षांपासून समृध्दी महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाचे काम एल अँड टी या कंपनीस मिळालेले असून या महामार्गाच्या कामात भूमीअधिग्रहणापासूनच मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याची चर्चा आहे. समृध्दी महामार्गाच्या कामासाठी गौण खनिज स्वामित्व शुल्क माफ करण्यात आले आहे, मात्र एल अँड टी कंपनीने गैरमार्गाचा वापर करून अनेक खोदकामे नियमबाह्य पद्धतीने केली आहे. विविध सिंचन प्रकल्प, नद्या-नाले यात नियमबाह्य खोदकाम करून त्यातून गाळाची माती व सुपीक मृदा, मुरूम, दगड, वाळू या गौण खनिजाची वाहतूक केली आहे. 

Displaying IMG-20211204-WA0091.jpg

समृध्दी महामार्गालगतच्या अनेक गावातील गायरान जमिनी, भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनी, इनाम व देवस्थान जमिनी यातून सर्व नियम धाब्यावर बसवून बेसुमार माती व मुरूमचा उपसा करण्यात येत आहे.यासंदर्भात करंजगांव येथील गोकुळ संतराम सुरासे या शेतकऱ्याने महसूल विभागाकडे अनेकवेळा तक्रारी करूनही त्याची दखल घेतली गेली नाही त्यामुळे श्री.सुरासे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या असून त्या प्रलंबित आहेत.

शुक्रवारी दुपारी बोरदहेगांव येथील गायरान जमीन गट न.153 मध्ये समृध्दी महामार्गाच्या कामासाठी अवैध गौण खनिज उत्खनन चालू असताना श्री.सुरासे यांनी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर व तहसीलदार राहुल गायकवाड यांना  व्हाट्सअप मॅसेजवरुन याची माहिती दिली व तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

Displaying IMG-20211204-WA0088.jpg

सुरासे यांच्या तक्रारीची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी कारवाईचे आदेश दिले त्यानुसार  तहसीलदार राहुल गायकवाड, मंडळ अधिकारी रिता पुरी, तलाठी महेंद्र गायकवाड, तलाठी प्रदीप ठेणगे यांच्या  पथकाने तात्काळ दहेगांव येथे जाऊन गायरान जमिनीत उत्खनन करणारे पोकलेन मशीन व गौण खनिजाची वाहतूक करणारी तीन हायवा वाहने जप्त केली.जमिनीतून उपसा केलेला माती व मुरूमचा साठा ही यावेळी जप्त करण्यात आला.