सुभाष देसाईंचा १२० कोटींचा भूखंड घोटाळा:देसाईंचा मुलगाच एजंट असल्याचा खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप

अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार-शिवसेना नेते सुभाष देसाई 

औरंगाबाद,२८ डिसेंबर / प्रतिनिधी :-  राज्यातल्या चार मंत्र्यांवर एकीकडे आरोप होत असतानाच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी सुभाष देसाई यांच्यावर १२० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी लँड कन्वर्जनच्या नावाखाली औरंगाबाद मध्ये ५२ प्लॉट रूपांतरीत केल्याचा आरोप केला आहे. बुधवारी सुभेदारी विश्राम गृह वर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, चिकलठाणा इंडस्ट्रियल भागात ५२ प्लॉटचा वापर बदलण्यात आला आहे. आणि यातील सगळ्यात मोठा एजंट हा शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मुलगा होता. त्यामुळे याबाबत एसआयटी स्थापन करून चौकशी केली तर सुभाष देसाई तुरुंगात असतील, असा दावा जलील यांनी केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून चौकशी समिती नेमावी अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. जलील हे औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

 गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात उद्योग येणे बंद झाले आहेत. तर गेल्या काही काळात औरंगाबादमध्ये एमआयडीसीच्या जागा विक्रीचा गोरखधंदा सुरु आहे. तर महाविकास आघाडीत उद्योग मंत्री राहिलेले आणि औरंगाबाद जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या कार्यकाळात कोणतेही उद्योग आणले नाहीत. मात्र उद्योगासाठी असलेल्या एमआयडीसीच्या जागा मात्र त्यांनी विक्री केल्या असल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला आहे.

इंडस्ट्रियल प्लॉटचा वापर उद्देशचा बदल करून हजारो कोटींचा घोटाळा देसाई यांनी केला. बिल्डरांकडून कोट्यावधी रुपये घेऊन प्लॉट नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले. या सर्व प्रकरणात देसाई यांचा मुलाचा सहभाग होता. देसाई यांचा मुलगा संबधित बिल्डरांशी संपर्क करून रेट ठरवित होता. तर हा सर्व घोटाळा तब्बल एक हजार कोटीच्या घरात असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

एकट्या औरंगाबादमध्ये शंभर-सव्वाशे कोटींचे प्रकरण समोर आले आहे, मग राज्यातील मोठ्या शहरातील एमआयडीसीमधील किती भूखंडांचे उद्देश बदलण्यात आले असतील, याचा अंदाज लावला तर हा घोटाळा एक हजार कोटींच्यावर जाईल. गेल्या दहा-पंधरा वर्षात राज्यातील ३२ हजार एकर इंडस्ट्रीयल भुखंडांचे उद्देश बदलण्यात आले आहेत, यात नारायण राणे, उद्योगमंत्री असतांनांच्या काळातील काही एमआयडीसीतील भुखंडाचा देखील समावेश असल्याचा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला.

खासदार जलील यांचे आरोप बिनबुडाचे आणि निराधार-शिवसेना नेते सुभाष देसाई 

खासदार इम्तियाज जलिल यांनी  आज पत्रकार परिषदेत माझ्यावर मी उद्योगमंत्री असताना औद्योगिक जमिनींचा घोटाळा केला असा बिनबुडाचा व निराधार आरोप केला आहे. हे आरोप करताना त्यांनी कोणतीही ठोस माहिती किंवा पुरावे दिले नाहीत. माझ्या चारित्र्यावर अशा रितीने शिंतोडे उडविण्याचाच हा प्रयत्न आहे. आणि म्हणून खा. इम्तियाज जलिल यांनी हे

निराधार आरोप त्वरित मागे घेऊन माझी माफी न मागितल्यास त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा व नुकसान भरपाईचा खटला दाखल करण्याचे ठरविले आहे.