अनिल देशमुख १४ महिन्यानंतर कारागृहाबाहेर येताच कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : शंभर कोटींच्या खंडणीप्रकरणी मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अखेर आज जामिनावर सुटका झाली. सुमारे १४ महिन्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी तुरुंगाबाहेर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. देशमुख यांचे जल्लोषात स्वागत केले. संध्याकाळी पाच वाजता अनिल देशमुख ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. त्यांना १ वर्ष १ महिना आणि २७ दिवस तुरुंगात रहावे लागले.

स्वागतासाठी देशमुख यांचे कुटुंबिय तुरुंगाबाहेर आले होते. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेतेही आले होते. यामध्ये अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे. अनिल देशमुख बाहेर येणार, हे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. देशमुख यांच्या नागपूर येथील घराबाहेरही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

अनिल देशमुख कारागृहाबाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी अनिल भाऊ आगे बडो, हम तुम्हारे साथ है… अशा घोषणा दिल्या.यावेळी आभार येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनी अनिल देशमुखांना पेढे चारत आनंद व्यक्त केला आणि त्यांचे स्वागत केले.

खोट्या आरोपांमध्ये फसवले

अनिल देशमुख यावेळी म्हणाले की, “मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आले. परमवीर सिंह यांनी माझ्यावर शंभर कोटींचा आरोप लावला. पण त्याच परमवीर सिंह यांनी न्यायालयात जाऊन प्रतिज्ञापत्र दिले, त्यामध्ये मी ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप केला होता, माझ्याकडे कोणताही पुरवा नाही, असे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर न्यायालयाच्या निर्णयामध्ये जे निरीक्षण केले आहे, त्यामध्ये परमबीर सिंह यांच्या अतिशय जवळचा सचिन वाझे याच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप आहे. अशा आरोपीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही. सचिन वाझेला आतापर्यंत दोन खूनाच्या आरोपांखाली अटक झाली आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला. मी त्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार मानतो.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कोणतेच आरोप सिद्ध न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. सत्य परेशान हो सकता लेकिन पराजित नही। याचीच प्रचिती येथे होते. अनिल देशमुख यांच्या संपूर्ण प्रकरणाचा वेध घेणारा हा व्हिडिओ…

१ नोव्हेंबर २०२१ रोजी ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीने देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. ईडीने अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते.