देशातील बऱ्याच मुली आळशी आहेत- सोनाली कुलकर्णी

मुंबई,१६ मार्च  /प्रतिनिधी :-फक्त मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. मात्र, यावेळी ती एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तिने भारतातील मुली आणि मुलांबाबत काही विधाने केली आहेत, ज्यामुळे तिची चांगलीच चर्चा होत आहे.

सदर व्हिडीओमध्ये सोनाली म्हणते की, “आपल्या देशातील बऱ्याच मुली आळशी आहेत. त्यांना असा बॉयफ्रेंड किंवा पती हवा, ज्याच्याकडे चांगली नोकरी, चांगले घर असेल. पण त्या मुलींमध्ये एवढी हिंमत होत नाही की, ती म्हणेल, ‘जेव्हा तू माझ्यासोबत लग्न करशील, तेव्हा मी आपल्या दोघांसाठी काय करु शकते?’ सध्याच्या घडीला अशा मुली घडवा, ज्या समान वागणूक देतात, ज्या स्वत:साठी कमावतील. जी बेधडकपणे बोलू शकेल की, घरात नवा फ्रिज घ्यायचा असेल, तर अर्धे पैसे मी देईन.” असे म्हणत तिने मुल-मुली समानतेवर भाष्य केले.

एवढच नव्हे तर तिने मुलींच्याही बाजू मांडल्या आणि सोबत मुलांच्याही बाजू मांडल्या. ती म्हणाली की, “मुलांवर १८व्या वर्षापासूनच एक प्रेशर असते. आता कमवावे लागेल, आता कुटुंबाला सपोर्ट करावे लागेल. याउलट काही मुली २५ – २७ वर्षांच्या होईपर्यंत विचारत करत राहतात की मी आता काय करू? काही मुली आपल्या बॉयफ्रेंडवर प्रेशर टाकतात. मला माझ्या भावांना बघून रडायला येते. माझ्या नवऱ्याला वयाच्या २०व्या वर्षापासूनच नोकरी करावी लागली. मुलींनी फक्त जेवण बनवायलाच नाही आले पाहिजे तर त्यापूढेही गेल्या पाहिजेत. मुलींनीही पुढे येऊन जबाबदाऱ्या घ्यायला हव्या.” असा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यांनी केलेल्या या व्यक्तव्यावर अनेकांनी कौतुक केले आहेत.